आघाडीच्या नेत्यांपाठी ईडीचा ससेमिरा लावण्यामागे फडणवीसांचे कारस्थान, नवाब मलिक यांचा गंभीर आरोप
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कितीही सरकार पाडण्याचा प्रयत्न केला तरी राज्यातलं सरकार आमच्या ताब्यात राहणारच आहे. इतकच काय आगामी काळात केंद्रातील सरकारही आम्ही ताब्यात घेऊ असा दावा करतानाच ईडीचा ससेमिरा पाठी लावण्यामागे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कटकारस्थान आहे.
मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी कितीही सरकार पाडण्याचा प्रयत्न केला तरी राज्यातलं सरकार आमच्या ताब्यात राहणारच आहे. इतकच काय आगामी काळात केंद्रातील सरकारही आम्ही ताब्यात घेऊ असा दावा करतानाच ईडीचा (ED) ससेमिरा पाठी लावण्यामागे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कटकारस्थान आहे. प्रत्येक नेत्यांच्यामागे ईडी कशी लावायची याचं मार्गदर्शन ते ईडी अधिकार्यांना करत आहेत, असं गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक (nawab malik) यांनी केला आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांना ईडीचा ओएसडी करून टाका, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी ईडीच्या कारवायांवरून उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्रं लिहिलं. त्यानंतर मीडियाशी बोलताना राऊत यांनी ईडी आणि भाजपवर जोरदार हल्ला केला. त्यानंतर मलिक यांनी हे विधान केल्याने खळबळ उडाली आहे.
नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधताना हा आरोप केला. राज्यातील सत्ता गेल्यानंतर भाजपला महाविकास आघाडी सरकार पाडायचे आहे. तीनपैकी एक पक्ष त्यांच्यासोबत जाण्याची परिस्थिती त्यांना निर्माण करायची आहे. त्यासाठी सेना नेत्यांच्या मागे ईडी लावली जात आहे. आमच्या नेत्यांच्यामागेही लावत आहेत. भाजपला वाटतंय घाबरुन सरकारमधून बाहेर पडतील व सोबत येतील हा भाजपचा गैरसमज आहे, असे नवाब मलिक म्हणाले.
जनता आमच्यासोबत राहील
ईडीच्या माध्यमातून भीती निर्माण करुन सत्ता काबीज करता येणार नाही. हे महाराष्ट्र आहे. शरद पवारांना नोटीस दिल्यानंतर तुमची काय परिस्थिती झाली होती हे राज्याने पाहिले होते. त्यामुळे तुम्ही जितका केंद्रीय यंत्रणांचा वापर करून सरकारला दाबण्याचा प्रयत्न करणार तितक्या ताकदीने महाराष्ट्राची जनता आमच्यासोबत राहिल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सत्ता अमर नसते
संजय राऊत यांनी लिहिलेली परिस्थिती सत्य आहे. या सगळ्या कारवायांना कुणीही घाबरणार नाही. ईडीचा अधिकारी राजेश्वर सिंग राजीनामा देतो आणि त्याला उत्तरप्रदेशमधून भाजप तिकिट देते याचा अर्थ ईडीचे अधिकारी भाजप कार्यकर्ते आहेत. सत्तेचा वापर करून हे करत आहात. परंतु सत्ता गेल्यानंतर विरोधक जर असं वागले तर तुमची काय परिस्थिती होईल हे भाजपला आणि अधिकार्यांना कळलं पाहिजे. सत्ता काय अमर नसते. सत्ता परिवर्तन झाल्यावर त्याचे उत्तर अधिकार्यांना द्यावे लागणार आहे. त्यामुळे ईडीच्या अधिकार्यांनी कायद्याने काम करावे, भाजप कार्यकर्ता म्हणून काम करु नये, असा इशाराही त्यांनी दिला.
हे जास्त दिवस चालणार नाही
महाविकास आघाडीचे सरकार 25 वर्ष टिकणार आहे. अधिकार्यांचा वापर करून बातम्या पेरायच्या. लोकांना बदनाम करायचे. नोटीसा पाठवायच्या हा सगळा उद्योग केंद्रीय यंत्रणांनी बंद करावा. हे जास्त दिवस चालणार नाही, असं सांगतानाच सोशल मीडियाच्या माध्यमातून मलाही धमक्या दिल्या जात आहेत. मी काही भित्रा नाही. भाजपला कितीही काही करु द्या. मी शेवटपर्यंत लढणार आहे, असंही त्यांनी म्हटलं.
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 9 February 2022 pic.twitter.com/MX086IceXK
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 9, 2022
संबंधित बातम्या:
मुंबई महापालिकेवर प्रशासक नेमणार, राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
मोदी माफी मागा अन्यथा भाजप नेत्यांच्या घरासमोर ‘महाराष्ट्रद्रोही’ म्हणून आंदोलन करु- नाना पटोले