ठाणे जिल्ह्यात तीन मंत्रीपदे? हे आहेत दावेदार, पालकमंत्रीपदासाठी भाजप-सेनेत रस्सीखेच
Devendra Fadnavis Cabinet Expansion: ठाणे लोकसभेत भाजप आमदार गणेश नाईक, आमदार संजय केळकर, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक हे प्रमुख दावेदार आहेत. कल्याण लोकसभा भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांची पुन्हा मंत्रिपदी निवड होईल.
Devendra Fadnavis Cabinet Expansion: महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर पहिला मंत्रिमंडळ विस्तार १४ डिसेंबर रोजी होणार आहे. या विस्तारासाठी महायुतीमध्ये सूत्रही ठरले आहे. भाजपला २० ते २१ मंत्रिपद मिळणार असून शिवसेनेच्या वाटेला १० ते १२ मंत्रिपद येणार आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला ८ ते १० मंत्रिपद दिले जाणार आहे. या विस्तारात ठाणे जिल्ह्यात तीन मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ठाणे, कल्याण, भिवंडी अशा तीन लोकसभा मतदारसंघातून प्रत्येकी एक मंत्री केला जाऊ शकतो.
हे आहेत दावेदार
ठाणे लोकसभेत भाजप आमदार गणेश नाईक, आमदार संजय केळकर, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक हे प्रमुख दावेदार आहेत. कल्याण लोकसभा भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांची पुन्हा मंत्रिपदी निवड होईल. भिवंडी लोकसभा मतदार संघातून भाजप आमदार किसन कथोरे याचा विचार केला जाऊ शकतो. कथोरे याचा देखील पक्षात मजबुत स्थान आहे. जिल्ह्यात भाजपने उभे केलेले सगळे नऊजण चांगल्या मताधिक्याने निवडून आले आहेत.
ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सहा जण निवडून आले आहेत. परंतु भाजपचा स्ट्राईक रेट जास्त आहे. तो पक्ष मोठा भाऊ ठरला आहे. भाजपच्या वाटेला जास्त पदे जाऊ शकतील. पण ठाण्यात पाळेमुळे रुजलेल्या शिंदेसेनेला हे कितपत रुचेल, याबाबत शंका व्यक्त होत आहे.
पालकमंत्रीपद कोणत्या पक्षाला?
दरम्यान, ठाणे हा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. या ठिकाणी पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळावे, यासाठी शिवसेना आग्रही आहे. दुसरीकडे भाजपला देखील ठाण्याचे पालकमंत्रीपद हवे आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने या जागेवर दावा केला होता. परंतु ती जागा शिवसेनेला दिली. आता पालकमंत्रीपद शिवसेनेला न देता भाजपकडे ठेवावे, अशी अपेक्षा भाजप कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. ठाण्याचा गड दोन्ही पक्षांना आपल्याकडे हवा आहे. आता त्यावर वरिष्ठ काय निर्णय घेतात? त्याकडे शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.