मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी भाजपमधील ओबीसी नेत्यांची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीत ओबीसी आरक्षणाबाबतची पुढील रणनीती ठरवण्यात येणार आहे. या बैठकीला भाजपचे बडे नेते उपस्थित आहेत. (devendra fadnavis call obc leaders meeting at his residence)
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसींचं आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केलं आहे. राज्य सरकारने केंद्राकडून ओबीसींचा इम्पिरिकल डेटा मिळावा म्हणून सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व आलं आहे. या बैठकीत ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करण्याबाबतची रणनीती ठरविण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे आदी नेतेही उपस्थित असल्याचं सांगितलं जात आहे.
एकीकडे फडणवीस यांच्या निवासस्थानी ओबीसी आरक्षणाबाबत पुढील रणनीती ठरवण्यासाठी बैठक होत आहे. तर दुसरीकडे राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ओबीसींच्या चिंतन बैठकीचं आयोजन केलं आहे. लोणावळ्यात येत्या 26 आणि 27 जून रोजी चिंतन बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या दोन दिवसीय शिबिराचं राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ उद्घाटन करणार आहेत. या शिबिराला पंकजा मुंडे, नाना पटोले आणि संजय राठोड यांनाही निमंत्रित करण्यात येणार असल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं. ओबीसींना आरक्षण मिळावं, आरक्षणातील अडथळे कोणते आहेत? ते कसे दूर करता येतील? त्यावर काय उपाय आहेत? याबाबतचं चिंतन करण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या समता परिषदेने काल नाशिकसह राज्यभरात ओबीसींचा आक्रोश मोर्चा काढला होता. यावेळी नाशिकच्या द्वारका चौकात जोरदार निदर्शने करत रास्ता रोको करण्यात आला होता. रास्ता रोको आंदोलनावेळी पोलिसांनी काही आंदोलकांची धरपकडही केली होती. तर, राज्याच्या इतर भागात या आंदोलनाला अल्प प्रतिसाद मिळाला होता.
ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार आक्रमक झाले आहेत. दोन्ही नेते ओबीसी आहेत. तर, राष्ट्रवादीतून छगन भुजबळांनी ओबीसींचं आंदोलन हाती घेतलं आहे. ओबीसी समाज आपल्याच बाजूने राहावा म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. मात्र, भाजपमधील ओबीसी नेते अजूनही ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर म्हणावे तसे सक्रिय झाले नाहीत. त्यामुळेच भाजपने ओबीसींच्या नेत्यांची बैठक बोलावल्याचं सांगितलं जात आहे. (devendra fadnavis call obc leaders meeting at his residence)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 18 June 2021 https://t.co/hOpnnBvaCK #News #bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 18, 2021
संबंधित बातम्या:
मूक आंदोलन सुरुच राहणार, आंदोलन मागे घेणार नाही, संभाजीराजे छत्रपती यांची माहिती
राष्ट्रवादीचा 100 विधानसभा मतदारसंघांवर डोळा?, काय आहे ‘सुपर 100’ मोहीम?; वाचा सविस्तर
(devendra fadnavis call obc leaders meeting at his residence)