Devendra Fadnavis : आता ही मेट्रो धावण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही, हा सिग्नलच आपण दिला, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सर्वात आधी कोणते काम केले असेल तर ते म्हणजे या प्रकल्पातील सर्व अडथळे दूर केले. त्यामुळे आता यामध्ये काहीही अडचणी राहिलेल्या नाहीत. काही आल्याच तर त्या दूर करण्याचा आमचा मानस राहील, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मुंबई : हा ऐतिहासिक असा क्षण आहे. मुंबईची नव्याने जी लाइफलाइन तयार होत आहे त्या मेट्रो 3च्या पहिल्या ट्रेनचे टेस्टिंग केले आहे. यशस्वीरित्या हे टेस्टिंग झाले आहे. आता ही मेट्रो धावण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही, हा सिग्नलच आपण दिला आहे, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना दिला आहे. मेट्रो 3च्या पहिल्या ट्रेनची चाचणी आज घेण्यात आली. या कार्यक्रमप्रसंगी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) बोलत होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सर्वात आधी कोणते काम केले असेल तर ते म्हणजे या प्रकल्पातील सर्व अडथळे दूर केले. त्यामुळे आता यामध्ये काहीही अडचणी राहिलेल्या नाहीत. काही आल्याच तर त्या दूर करण्याचा आमचा मानस राहील, असे फडणवीस म्हणाले.
‘त्यावेळी आत्मिक समाधान मिळेल’
कांजूरमार्गला स्टेशन केले असते तरी याठिकाणची जागा मोकळी होत होती, असे काही नाही. यासंबंधी मुंबईकरांच्या हिताचा निर्णय तुम्ही घेतला, त्याबद्दल अभिनंदन, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. यात राजकारण झाले. त्यामुळे या प्रकल्पाचा खर्चही वाढला, अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. ज्यावेळी या 40 किलोमीटरवर ट्रेन धावेल त्यावेळी आत्मिक समाधान मिळेल, असेही ते म्हणाले.
काय म्हणाले फडणवीस?
‘वेळेत निर्णय केला नसता तर..’
मुख्यमंत्र्यांनी वेळेत निर्णय केला नसता तर पुढच्या वर्षी काय, पुढचे चार वर्ष ट्रेन धावूच शकली नसती. वीस हजार कोटीची गुंतवणूक केली ती वाया गेली असती. त्यावर अजून 15-20 हजार कोटी रुपये खर्च करावे लागले असते. हा सर्व भार सामान्य मुंबईकरांवर आला असता. त्याच्या तिकीटातून तो वसूल झाला असता, असे फडणवीस म्हणाले.
‘हा विषय पर्यावरणापेक्षा राजकीय जास्त’
मेट्रोच्या कारडेपोचा वाद झाला हा पर्यावरणापेक्षा राजकीय जास्त झाला. यासंदर्भात उच्च न्यायालयाने चांगला निर्णय घेऊन मान्यता दिली. सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली. तो निर्णय कोणी वाचला तर तो स्पष्ट आहे. पर्यावरणाचा विचार करूनच ही परवानगी देण्यात आली, असे ते म्हणाले. अडीच लाख टन कार्बन उत्सर्जन कमी होईल, अशी माहिती त्यांनी दिली.