Sushma Andhare : देवेंद्र फडणवीस तर सत्ताप्रेमानं आंधळे झालेले कलियुगातील धृतराष्ट्र, सुषमा अंधारेंची जहरी टीका
एक धृतराष्ट्र पुत्रप्रेमाने आंधळे होते, तर आताचे धृतराष्ट्र सत्ताप्रेमाने आंधळे झाले आहेत. सत्तेआधी ज्यांच्यावर त्यांनी ढिगाने आरोप केले होते, त्यांच्या मांडीला मांडी लावून खुर्चीच्या प्रेमापोटी सत्तेत बसलेले आहेत, अशी टीका सुषमा अंधारेंनी केली.
मुंबई : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तर सत्ताप्रेमाने आंधळे झालेले कलियुगातील धृतराष्ट्र आहेत, अशी जहरी टीका शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केली आहे. त्या पुण्यात बोलत होत्या. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत काल भारतीय जनता पार्टीचा मेळावा पार पडला, त्यात भाजपाचे मुंबई आणि राज्यातील अनेक नेते उपस्थित होते. याच मेळाव्यात बोलताना भाजपाचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी देवेंद्र फडणवीस यांची स्तुती करताना देवेंद्र फडणवीस यांना श्रीकृष्णाची उपमा दिली होती. आत्ताच्या कलयुगात देवेंद्र रुपी कृष्णाने एकनाथरुपी कर्णाला युद्धातून बाहेर काढले, असे म्हणत शिवसेनेला डिवचले होते. त्यावरूनच सुषमा अंधारे यांनी भाजपाला लक्ष्य केले आहे. केवळ सत्तेसाठी भाजपा अशाप्रकारची भाषा वापरत असल्याची टीका त्यांनी केली आहे.
भाजपा मेळाव्यात काल केली होती शिवसेनेवर टीका
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे मंत्री मंगलप्रभात लोढा आणि आशिष शेलार यांचा सत्कार भाजपाच्या मुंबईतील मेळाव्यात करण्यात आला. बीएमसी निवडणूक प्रचाराचा नारळ यानिमित्ताने भाजपाने फोडला. यावेळी आशिष शेलार तसेच देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. आशिष शेलार यांनी तर देवेंद्र फडणवीसांना चक्क श्रीकृष्णाची उपमा देऊन टाकली आणि त्याआडून शिवसेनेवर टीका केली होती.
‘शेलार यांच्या बुद्धिमत्तेची कीव करावी वाटते’
शिवसेनेनेही आता भाजपाच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आशिष शेलार आणि भाजपावर टीका केली आहे. आशिष शेलार यांच्या बुद्धिमत्तेची मला कीव करावी वाटते, असा घणाघात त्यांनी केला आहे. त्यासोबतच आशिष शेलार, किरीट सोमैया ही मंडळी शकुनी मामाच्या भूमिका आलटून पालटून करत असतात, असे देखील सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.
सुषमा अंधारेंचा हल्लाबोल
‘खुर्चीच्या प्रेमापोटी सत्तेत बसले’
देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना त्या म्हणाल्या, की एक धृतराष्ट्र पुत्रप्रेमाने आंधळे होते, तर आताचे धृतराष्ट्र सत्ताप्रेमाने आंधळे झाले आहेत. सत्तेआधी ज्यांच्यावर त्यांनी ढिगाने आरोप केले होते, त्यांच्या मांडीला मांडी लावून खुर्चीच्या प्रेमापोटी सत्तेत बसलेले आहेत. ज्यांना संकटातून बाहेर काढले असे म्हणतायत, ते कर्ण नाहीत, तर ते दुःशासनाच्याही पुढचे लोक आहेत, अशी जहरी टीका त्यांनी भाजपावर केली आहे.