सभागृहातला हास्यकल्लोळाचा अनोखा VIDEO, अजित पवार ‘हो’ म्हणताच फडणवीस जोरजोरात बाक वाजवू लागले
अजित पवार यांनी आज सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या एका दाव्याला दुजोरा दिला. या गोष्टींचा देवेंद्र फडणवीस यांना प्रचंड आनंद झाला. या आनंदात त्यांनी जोरजोरात बाक वाजवला.
मुंबई | 28 जुलै 2023 : विधीमंडळाचं सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनादरम्यान आज विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच वादविवाद बघायला मिळतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आपलं भाषण करत असताना एक दावा केला. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अजित दादा हे खरं आहे का? असा प्रश्न विचारला. त्यावर अजित पवार यांनी आपल्या जागेवरुन उभं राहून होय, हे खरं आहे, असं म्हटलं. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अत्यंत खूश झाले. ते जोरजोरात बाक वाजवायला लागले. यावेळी त्यांच्यासह इतर भाजप आणि शिंदे गटाचे आमदारही जोरजोरात बाक वाजवू लागले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शासन आपल्या दारी योजनेचं महत्त्व सांगत होते. यावेळी हा प्रसंग घडला. “शासन आपला दारी कार्यक्रम अतिशय लोकप्रिय झालेला आहे. विरोधी पक्षातील आमदारांनीदेखील या योजनेची मागणी केली आहे. त्यांनासुद्धा आपण या योजनेला लाभ देऊ. भेदभाव करणार नाही”, असं मुख्यमंत्री म्हणाले.
नेमकं काय घडलं?
“या सगळ्या योजना एकाच छताखाली देण्याचा निर्णय आपण घेतला. तिथे लागणारे कागदपत्रे देखील तिथेच मिळणार. शासन आपल्या दारी या योजनेची माहिती घ्या आणि आपल्या लोकांना सांगा की ती योजना किती महत्त्वाची आहे. यामुळे सर्वसामान्यांना हेलपाटे घालण्याची गरज नाही. पूर्वी सगळं हेसपाटेवालं काम होतं. आता हेलपाटे हा शब्द बंद”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
एकनाथ शिंदे यांनी हेलपाटे शब्दावर भर दिला आणि ते वारंवार तेच बोलू लागले. त्यानंतर नाना पटोले यांनी अजित पवार यांना उद्देशून दादा हे खरं आहे का? असा प्रश्न विचारला. त्यानंतर अजित पवार सभागृहात आपल्या जागेवरुन उठले आहे होय हे खरंय असं म्हणाले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मोठमोठ्याने हसत जोरात बाक वाजवला.
यावेळी एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचा दावा केला. विरोधी पक्षनेते असताना अजित पवार यांना मनासारखं काम करता येत नव्हतं, असा दावा शिंदेंनी केला. त्यावर अजित पवार यांनी होय, खरंय, असं म्हणत दुजोरा दिला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं.
अजित पवार यांना विरोधी पक्षात काम करताना अडचणी येत होत्या?
“अजित पवार जेव्हा आपल्या सरकारसोबत आले तेव्हाच त्यांनी सांगितलं होतं की देशाला पुढे न्यायचं असेल, देशाची उन्नती करायची असेल तर नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व पाहिजे. या राज्य सरकारचं काम गतिमान आहे म्हणून मी या राज्य सरकार येतोय हे त्यांनी सांगितलं. हे सांगितलं ना त्यांनी. आता तिकडे (विरोधी पक्षात) काम करताना त्यांना अडचण येत होती”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
त्यावर अजित पवार खूप जास्त असं म्हणतात. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणतात की, “त्यांचा वेग हा १००चा आहे आणि त्यांना २० च्या वेगाने चालावं लागत होतं.” त्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले, “१००चा आणि २०चा स्पीड मॅच होऊ शकत नाही. आता तो स्पीडपण वाढला आहे. समृद्धीचा वेग १५० झालाय. तुम्हाला वाटलं हे चुकीचं आहे तर बोलाना. पण आम्ही जे चांगलं काम करतोय त्यावर टीका करु नका. शेवटी सर्वसामान्यांना त्याचा फायदा होतो.”