100 वर्षात असा बजेट पाहिला नाही; अमृता फडणवीस ट्रोल
कोणतेही अतिरिक्त कर न लादता विकासाला चालना कशी द्यायची, याचा हा अर्थसंकल्प उत्तम नमुना आहे. | Amruta Fadnavis
मुंबई: युनिक फॅशन सेन्स, गोड आवाज आणि राजकीय शेरेबाजीमुळे सोशल मीडियावर कायम चर्चेत असणाऱ्या अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना सध्या ट्रोल केले जात आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सोमवारी संसदेत वार्षिक अर्थसंकल्प (Budget 2021) सादर केला. त्यानंतर अमृता फडणवीस यांनी एक ट्विट केले होते. गेल्या 100 वर्षात देशात असा अर्थसंकल्प कधी सादरच झालेला आपण पाहिलाच नाही. कोणतेही अतिरिक्त कर न लादता विकासाला चालना कशी द्यायची, याचा हा अर्थसंकल्प उत्तम नमुना आहे. या अर्थसंकल्पातून जगातील इतर देशांनाही खूप काही शिकण्यासारखे असल्याचे अमृता यांनी ट्विटमध्ये म्हटले होते. (Amruta fadnavis troll over twitter after union budget 2021)
Thank you FM Smt @nsitharaman for presenting budget in a manner never seen in a 100 years in India. All countries in the world will now observe and learn the art of giving impetus to growth without levying additional tax. #Budget2021 #UnionBudget2021 #NirmalaSitaraman
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) February 1, 2021
मात्र, ट्विटरवरील काही युजर्सनी एक बिनतोड मुद्दा उपस्थित करत अमृता फडणवीस यांना ट्रोल केले. भारताला स्वातंत्र्य मिळूनच 74 वर्षे झाली मग तुम्ही 100 वर्षातील चांगला अर्थसंकल्प असे कसे म्हणू शकता? यापूर्वी देशात इंग्रजांनीच चांगला बजेट सादर केला होता, असे तुम्हाला म्हणायचे आहे का?, असे प्रश्न विचारत नेटकऱ्यांनी अमृता फडणवीस यांची फिरकी घेण्याचा प्रयत्न केला.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना अर्थशास्त्राची उत्तमा जाण असल्यामुळे ते अर्थसंकल्पानंतर काय बोलतात, याकडे सगळ्यांचेच लक्ष असते. त्यांनी मोदी सरकारच्या या अर्थसंकल्पाचे कौतुक केले. आत्मनिर्भर पॅकेजच्या माध्यमातून कोविडच्या संकटकाळात सरकारने अनेक पॅकेजेस घोषित केली आहेत. केंद्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प कोरोना संकटाला संधीत परावर्तित करणारा आहे. तसेच देश आणि देशातील नागरिकांच्या आकांक्षांना नवउभारी देण्याचा संकल्प आणखी दृढ करणारा असल्याचे फडणवीस यांनी म्हटले होते.
एलआयसी आणि आयडीबीआयचं खासगीकरण नाही, सामान्य माणसाला त्याची मालकी मिळणार : देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस यांनी मोदी सरकारच्या एलआयसी आणि सरकारी बँकांच्या खासगीकरणाच्या निर्णयाची पाठराखण केली. एलआयसी आणि आयडीबीआयमध्ये खासगीकरण होणार नाही. आयपीओच्या माध्यमातून सामान्य माणसाला त्याची मालकी मिळणार आहे. त्यामुळे याला खासगीकरण बोलणं योग्य ठरणार नाही. आपण त्याला निर्गंवतणूक बोलू शकतो. शा प्रकारचा निर्णय यापूर्वी अनेकदा झाला किंवा यूपीए सरकारच्या काळातदेखील निर्गुंतवणूकीची जी पॉलिसी ठरली होती त्यात हे सर्व आलंच होतं. परंतु त्यावेळी खासगी गुंतवणुकीतून हे सर्व करायचं ठरलं होतं. त्यामुळे त्याला विरोध केला गेला होता. आता खासगी गुंतवणूकच्या ऐवजी आयपीओचा मार्ग आहे. हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग असल्याचे फडणवीस यांनी म्हटले.
संबंधित बातम्या:
Budget 2021 : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांची बजेटवर एका ओळीत कमेंट
अर्थसंकल्पानं देशातील जनतेला मरणाच्या वाटेवर नेऊन ठेवलं; अजित पवारांची जहरी टीका
एलआयसी आणि आयडीबीआयचं खासगीकरण नाही, सामान्य माणसाला त्याची मालकी मिळणार : देवेंद्र फडणवीस
(Amruta fadnavis troll over twitter after union budget 2021)