Big News: ‘बलात्कार केल्याची तक्रार देईन’ असं म्हणून धनंजय मुंडेंना धमकावणाऱ्या महिलेला अटक
धनंजय मुंडे यांना बलात्काराची तक्रार करण्याची धमकी देणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे.
मुंबई : धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना बलात्काराची तक्रार (Rape case) करण्याची धमकी देणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे. धनंजय मुंडे यांना धमकावणाऱ्या रेणू शर्मा हिला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. रेणू शर्मा (Renu Sharma) या महिलेवर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे 5 कोटीची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. त्याप्रकरणी मुंबईच्या पोलीस ठाण्यात इंदौरच्या महिले विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. संबधित गुन्हा पुढील तपासासाठी क्राईम ब्रांचकडे वर्ग करण्यात आलेला आहे. आरोपी महिलेने मुंडे यांच्याविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार केली होती. नंतर महिलेने मुंडेविरोधातील तक्रार मागे घेतली होती. त्यानंतर फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात आंतरराष्ट्रीय नंबरहून महिलेने फोन करत 5 कोटी रुपये किंमतीचे दुकान आणि महागड्या मोबाइलसाठी तगादा लावलेला.
मागण्या पूर्ण न केल्यास सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकी देत, पून्हा गुन्हा दाखल करण्याची धमकी महिलेने दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणी क्राईम ब्रांचचे पोलिस अधिक तपास करत आहेत.
सकाळी तक्रार, दुपारी अटक!
गुरुवारी (21 एप्रिल) सकाळीच धनंजय मुंडे यांनी पोलिसांत याप्रकरणी तक्रार दिल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यानंतर दुपारीच याप्रकरणातील संशयित आरोपील महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. मलबार हिल पोलीस ठाण्यात धनंजय मुंडे यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर धनंजय मुंडे यांना धमकावून खंडणी उकळणारी महिला कोण आहे, असा प्रश्न उपस्थित झाला होता. अखेर ही महिला रेणू शर्मा असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी आता रेणू शर्मा हिला अटक केली असून तिची कसून चौकशी पोलिसांकडून केली जाते आहे.
रेणू शर्मावर धनंजय मुंडे काय म्हणाले?
खंडणी मागून धमकावणाऱ्या महिलेप्रकरणी धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय की, …
गेली दीड ते दोन वर्षांपासून हा त्रास होतोय. त्यांनी खोटी तक्रार माझ्या विरुद्ध केली. ती तक्रार परत वापस घेतली. काही दिवसापासून जो त्रास होता तो मी सहन करत होतो. शेवटी सहनशीलता संपली आणि मला पोलिसांमध्ये तक्रार द्यावी लागली. या पुढे जे काही करतील ते पोलीस करतील.
हे प्रकरण नेमकं काय आहे? सोप्या शब्दांत समजून घ्या!
- फेब्रुवारी ते मार्च महिन्यात एका महिलेने आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून फोन केला.
- इंटरनॅशनल कॉल करुन 5 कोटींचे दुकान आणि महागड्या मोबाईलची मागणी या महिलेनं केली.
- मागणी पूर्ण न केल्या सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकी मुंडेंना देण्यात आली.
- धनंजय मुंडे यांनी या धमकीनंतर ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातून 3 लाख रुपये आणि महागडा मोबाईलही कुरियरद्वारे महिलेला पाठवला.
- त्यानंतर पुन्हा महिलेनं आणखी 5 कोटींच्या ऐवजाची मागणी केली.
- आपली मागणी पूर्ण केली नाही, तर तुमच्याविरोधात बलात्कार केल्याची तक्रारा पोलिसात देईन, अशी धमकी महिलेनं दिल्याचा धनंजय मुंडे यांचा आरोप आहे.
- धनंजय मुंडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
- क्राईम ब्रांचने केलेल्या कारवाईत या महिलेला अटक करण्यात आली. रेणू शर्मा असं अटक केलेल्या महिलेचं नाव आहे.