10 वर्षाच्या मुलीने 2 वर्षांपूर्वी गिळलेली पिन फुफ्फुसातून काढण्यात डॉक्टरांना यश
१० वर्षाच्या मुलीने 2 वर्षांपूर्वी गिळलेली पिनं फुफ्फुसातून यशस्वीरित्या काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे. चेंबूर येथील झेन मल्टीस्पेशालिटी रूग्णालयात या मुलीवर यशस्वी उपचार करण्यात आला आहे.
मुंबई : एका १० वर्षाच्या मुलीने 2 वर्षांपूर्वी गिळलेली पिनं फुफ्फुसातून यशस्वीरित्या काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे. चेंबूर येथील झेन मल्टीस्पेशालिटी रूग्णालयात या मुलीवर यशस्वी उपचार करण्यात आला आहे. उपचारानंतर मुलीच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने 48 तासात तिला घरीही सोडण्यात आलं. झेन रूग्णालयातील कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. क्षितीज शहा यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. शलाका दिघे, बालरोग पल्मोलॉजिस्ट डॉ. सागर वारणकर आणि भूलतज्ज्ञ डॉ. प्रमोद काळे या डॉक्टरांच्या टीमनं हे यशस्वी उपचार केले आहेत.(Doctor succeed in removing metal pin from girl’s lung)
खेळताना धातूची पिन गिळली!
नायरा शहा (नाव बदललेलं आहे) हिने दोन वर्षांपूर्वी खेळताना अचानक एक धातूची पिन गिळली. कुटुंबियांना हे कळल्यावर त्यांनी तातडीने मुलीच्या पोटाचा एक्स-रे काढला. या वैद्यकीय चाचणीतून काहीही आढळून आले नाही. चाचणी अहवालात काहीच दिसून न आल्याने सर्वजण चिंतामुक्त झाले. कालांतराने तिचे कुटुंबीय ही घटना विसरूनही गेले. मात्र, दीड वर्षानंतर मुलीला वारंवार खोकल्याचा त्रास जाणवू लागला. मुलीची प्रकृती पाहून कुटुंबियांनी तिला झेन रूग्णालयात दाखल केले.
ब्रॉन्कोस्कोपीद्वारे पिन बाहेर काढण्यात यश
रूग्णालयातील कान-नाक-घसा शल्यचिकित्सक डॉ. शाह यांनी सांगितलं की “या मुलीच्या छातीचा एक्स-रे काढला असता तिच्या छातीच्या डाव्या बाजूला खाली वायूमार्गाच्या भागात पिन आढळून आली. ही पिन शोधण्यासाठी छातीचा सीटीस्कॅन काढण्यात आला. त्यानंतर ब्रॉन्कोस्कोपीद्वारे फुफ्फुसात अडकलेली ही पिन बाहेर काढण्यात आली.”
“श्वसनमार्गात अडकलेली बाहेरील वस्तू काढून टाकण्यासाठी ब्रॉन्कोस्कोपी केली जाते. भूल देऊन ही प्रक्रिया करावी लागते. ब्रॉन्कोस्कोपी वापरून फुफ्फुसातील वायुमार्गापर्य़ंत प्रवेश मिळविण्याची ही प्रक्रिया आहे. साधारणतः एक तास ही शस्त्रक्रिया सुरू होती. या शस्त्रक्रियेनंतर अवघ्या तासाभरात मुलाच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आली,” अशी माहिती डॉ. शलाका दिघे यांनी दिली.
इतर बातम्या :
मुंबईतील जम्बो कोव्हिड सेंटर पुन्हा सज्ज होणार, प्रत्येक वॉर्डमध्ये कोव्हिड सेंटरचीही उभारणी
Food Tips | आयुर्वेद सांगतंय मधासोबत ‘या’ गोष्टी खाऊ नका एकत्र, अन्यथा आरोग्याला होऊ शकते हानी!
Doctor succeed in removing metal pin from girl’s lung