लॉकडाऊनकाळात कर्मचारी कपात किंवा पगार कपात करु नये, हायकोर्टात जनहित याचिका
लॉकडाऊनच्या काळात कर्मचारी कपात किंवा पगार कपात करु नये अशी मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टात (PIL against salary and Staff cuts) करण्यात आली आहे.
मुंबई : लॉकडाऊनच्या काळात कर्मचारी कपात किंवा पगार कपात करु नये अशी मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टात (PIL against salary and Staff cuts) करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या काळात कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणे किंवा कमी करण्याचे प्रकार सुरु आहेत. याशिवाय अनेकांच्या पगारात कपात किंवा पूर्णत: पगार न देण्याचा निर्णय अनेक कंपन्या, व्यावसायिकांनी घेतला आहे. मात्र त्याविरोधात मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. अॅड. युसूफ इकबाल यांनी ही याचिका दाखल केली आहे. (PIL against salary and Staff cuts)
कोरोनामुळे देशात सर्वत्र लॉकडाऊन आहे. खासगी कार्यालये, कंपन्या बंद आहेत. लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी या आस्थापनाबाबत अध्यादेश काढला होता. त्यात कोणत्याही खासगी कंपनी,कॉर्पोरेशनने लॉकडाऊन काळात आपल्या कामगारांना कामावरुन काढू नये, त्यांच्या पगारात कोणतीही कपात न करता त्यांना पूर्ण पगार द्यावा,असं म्हटलं आहे. मात्र, यानंतरही अनेक कंपन्या आपल्या कामगारांना कामावरुन कमी करत आहेत. एकूणच सरकारच्या अध्यादेशाचं उल्लंघन करत आहेत, असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे. याचबाबत ही जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
या याचिकेत अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत. ही याचिका ऑनलाईन दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत केंद्र सरकार, राज्य सरकार यांना प्रतिवादी करण्यात आलं आहे.