Sanjay Raut : संजय राऊत यांना ईडीचं समन्स, चौकशीला हजर राहण्याचे आदेश; राऊत चौकशीला सामोरे जाणार?
भाजपावर आणि शिवसेनेतील बंडखोरांवर सातत्याने टीका करणाऱ्या संजय राऊत यांच्यावर राजकीय सुडापोटी ईडी वारंवार समन्स बजावत असल्याच्या चर्चा आता सुरू झाल्या आहेत.
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीनं समन्स बजावलं आहे. उद्या चौकशीसाठी त्यांना बोलावण्यात आले आहे. त्यामुळे आता या चौकशीला संजय राऊत सामोरे जाणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. भाजपावर आणि शिवसेनेतील बंडखोरांवर सातत्याने टीका करणाऱ्या राऊत यांच्यावर राजकीय सुडापोटी ईडी (ED summons) वारंवार समन्स बजावत असल्याच्या चर्चा आता सुरू झाल्या आहेत. गोरेगाव पत्राचाळ घोटाळाप्रकरणी संजय राऊत यांना पुन्हा समन्स बजावण्यात आले आहे. उद्या सकाळी अकरा वाजता त्यांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात बोलावण्यात आले आहे. दरम्यान, संजय राऊत सध्या दिल्लीमध्ये (New Delhi) आहेत. त्यामुळे ते उद्याच चौकशीला हजर राहतील की नाही, याबाबत स्पष्टता नाही. राऊत यांच्याकडूनही अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही.
सुजीत आणि स्वप्ना पाटकर यांचीही झाली चौकशी
सुजीत पाटकर आणि स्वप्ना पाटकर यांचीही चौकशी झाली. ते ईडी कार्यालयातून निघून गेले आहेत. सकाळी अकरा वाजल्यापासून सुजीत पाटकर यांची चौकशी झाली. तर स्वप्ना पाटकर दुपारी दोन वाजता ईडीच्या कार्यालयात पोहोचल्या होत्या. त्या संध्याकाळी सहावाजता निघून गेल्या. आता या दोघांच्या चौकशीनंतर पुन्हा एकदा संजय राऊत यांची चौकशी होणार आहे. या प्रकरणामध्ये आतापर्यंत जेवढे पुरावे ईडीच्या हाती लागलेले आहेत, त्या अनुषंगाने राऊत यांची चौकशी होणार आहे. प्रवीण राऊत यांच्याशी संबंधित मनी लाँडरिंगचे हे प्रकरण आहे. ते आधीपासूनच अटकेमध्ये आहेत. याप्रकरणी राऊत यांची अकरा कोटींची मालमत्ताही ईडीने जप्त केली ज्यात त्यांच्या राहत्या घराचाही समावेश होता.
आधीही बजावण्यात आले होते समन्स
पत्राचाळ प्रकरणात अंमलबजावणी संचलनालयाकडून 1 जुलैला शिवसेना खासदार संजय राऊत यांची चौकशी करण्यात आली होती. दुपारी 12 वाजता ईडी कार्यालयात संजय राऊत हजर झाले होते. त्यानंतर तब्बल 10 तासांनी ते ईडी कार्यालयातून बाहेर आहे होते. मी चौकशीला सहकार्य केले. केंद्राची तपास यंत्रणा आहे. त्यांचे काही गैरसमज माझ्यासारख्याने दूर करायला हवेत. शंका मी दूर केल्या आहेत. जी त्यांना माहिती हवी होती ती त्यांना दिली आहे. गरज पडल्यास मला परत बोलवा, असे त्यावेळी राऊत म्हणाले होते.