एकनाथ शिंदे भाकरी फिरवणार! मुंबईत महापालिका निवडणुकीआधी मोठा ट्विस्ट
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने येणाऱ्या महापालिका निवडणुकीत विजयी होण्यासाठी संघटना मजबूत करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे मुंबईत भाकरी फिरवणार आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या मुंबई शाखांमध्ये मोठे फेरबदल करण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर आता राज्यात महापालिका निवडणुकांचे वेध लागले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राज्यात महापालिका निवडणुकांची कधीही घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाच्या गोटात स्थानिक पातळीवर संघटना मजबुत करण्यासाठी वेगवान घडामोडी सुरु झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून तर मोठा निर्णय घेण्यात आला. एकनाथ शिंदे मुंबईत भाकरी फिरवणार असल्याची माहिती मिळत आहे. एकनाथ शिंदे आता स्थानिक पातळीवरची पदाधिकाऱ्यांची फळीच बदलण्याच्या तयारीत आहेत. शिवसेना मुंबईत प्रत्येक शाखेतील पदाधिकाऱ्यांची नव्याने नियुक्ती करणार आहे. त्यामुळे पक्षाला मुंबईत नाविन्याने आणि उत्साहाने पालिका निवडणुकीला सामोरं जाता येणार असल्याची चर्चा आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची आज मुंबईच्या रंगशारदा सभागृहात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत याबाबतचे निर्णय घेण्यात आल्याची माहिती रामदास कदम यांनी बैठकीनंतर दिली.
“खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईतल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज झाली. या बैठकीत संघटनात्मक चर्चा झाली. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत सुद्धा चर्चा झाली. येत्या 23 तारखेला मुंबईच्या बीकेसीमध्ये भव्य मेळावा पार पडेल. त्या मेळाव्यात शिवसेनेचे सर्व आमदार आणि खासदार यांचा भव्य सत्कार केला जाईल. मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार होईल. 23 तारखेला बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त हा मेळावा आयोजित केला आहे. मुंबईतील सर्व शाखाप्रमुख आणि सर्व पद रिक्त करून नवीन नियुक्ती केली जाईल”, अशी महत्त्वाची माहिती रामदास कदम यांनी दिली.
पदाधिकाऱ्यांची नव्याने नियुक्ती कशी होणार?
“मुलाखती घेऊन तशा प्रकारची नियुक्ती केली जाईल. कोणी कशाप्रकारे काम केलं याचा आढावा घेऊन समिती नियुक्ती करेल. गिरगाव, दादर अशाप्रकारे समित्या गठीत केल्या जातील. ज्या समितीला जे नाव योग्य वाटेल ते नाव ती समिती मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना कळवेल आणि मग मुख्य नेते एकनाथ शिंदे त्याबाबत निर्णय घेऊन नियुक्ती करतील, असा निर्णय आजच्या बैठकीत झाला”, असं रामदास कदम यांनी सांगितलं.
“मेळाव्यानंतर 24 तारखेपासून 9 फेब्रुवारी या तारखेपर्यंत आपण सभासद नोंदणी करत आहोत. सभासद नोंदणीची सुद्धा मोहीम आपण मुंबईत घेत आहोत. या काळात आतापर्यंतची सगळ्यात मोठी सभासद नोंदणी होईल, असा विश्वास मला आहे”, असंही रामदास कदम यावेळी म्हणाले.
उद्धव ठाकरे महायुतीत येतील?
यावेळी पत्रकारांनी रामदास आठवले यांना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महायुतीत येतील का? असा प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली. “आगामी पालिकेबद्दल मुख्य नेते एकनाथ शिंदे निर्णय घेतील. शिवसेना-भाजप अशी आमची युती आहे. आमच्या युतीमध्ये अजिबात मतभेद नाहीत. कोणी आमच्या युतीमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला तरीही आमची युती राहील. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आता भीती वाटायला लागली. उद्धव ठाकरे आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल अत्यंत खालच्या भाषेत बोलले. निर्लज्ज सदासुखी अशा प्रकारे येथे आहेत. मला ते सांगायला सुद्धा लाज वाटते. इतका खालच्या पातळीत बोलले. त्यांचा पिल्लू तीन वेळा जाऊन फडणवीस यांना भेटलं. पंतप्रधानांना सुद्धा इतका वाईट बोलले. पंतप्रधान आणि अमित शाह यांच्यासोबत असं वाईट बोलल्यानंतर त्यांना फडणवीस एकत्र आणतील, असं मला वाटत नाही”, अशी प्रतिक्रिया रामदास कदम यांनी दिली.