ग्रँड हयात हॉटेलमध्ये काय घडलं? अजित पवारही साक्षीदार असल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत जोरदार भाषण केलं. यावेळी त्यांनी ग्रँड हयात हॉटेलचं नाव काढत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उल्लेख केला. खरंतर त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. यावेळी त्यांनी ठाकरेंना इशारादेखील दिला.
मुंबई | 4 ऑगस्ट 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता प्रचंड निशाणा साधला. एकनाथ शिंदे यांनी यावेळी 50 खोक्यांच्या मुद्द्यावरुन ठाकरे गटावर टीका केली. विशेष म्हणजे निवडणूक आयोगाच्या निकालानंतर ठाकरे गटाकडून आपल्याला 50 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. आपण क्षणाचाही विलंब न करता ते 50 कोटी रुपये देवून टाकले, असं एकनाथ शिंदे यांनी सभागृहात सांगितले. यावेळी त्यांनी सभागृहात संबंधित पत्र देखील दाखवलं. यावेळी त्यांनी ठाकरे गटावर निशाणा साधताना ग्रँड हयात हॉटेलच्या किस्स्याची आठवण काढली. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही उल्लेख केला.
“हे (ठाकरे गट) यूज आणि थ्रो कधी करतील कुणालाही कळणार नाही, म्हणून खेकड्याचा विषय काढला. रोकडे बंद झाले की खेकडे दिसायला लागले. त्यामुळे खेकड्याची वृत्ती कुणाची आहे ते सगळ्यांना माहिती आहे. कुणी कुणाचे पाय खेचले यांचे नावे मी घेत नाही. नारायण राणे असतील, राज ठाकरे असतील, छगन भुजबळ असतील, मी थोडी मेहनत करायला गेलो, मनोहर जोशींना तर स्टेजवरुन वरुन खाली उतरवून पाठवलं. विजय वडेट्टीवारही मूळ शिवसैनिक आहेत”, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.
“आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे खरे शिवसैनिक आहोत. त्यांची शिकवण आमच्याकडे आहे. त्यांच्या विचारांनी आम्ही पुढे जातोय. आम्ही कुठेही चुकीचं वागणार नाहीत”, असं मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
“आणखी एक गोष्ट आहे, अजित दादा सांगू की नको? कारण त्याच्यात अजित दादा साक्षीदार आहेत. आपण हयात हॉटेलमध्ये होतो. तुम्ही, मी आणि सुनील तटकरे आपण होतो ना? एवढ्या उभ्या हयातीत कुणीच काढलं नसेल तेवढं त्या माणसाने आमच्यासमोर काढलं. पूर्ण. एवढी बदनामी म्हणजे, एवढ्या खालच्या भाषेत तिथे, जेव्हा वेळ येईल तेव्हा मोकळेपणाने मी बोलेन. मी सांगतो, अशी परिस्थिती कुणावरही येऊ नये”, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.
“आम्हाला दुषणं दिली. काही लोक म्हणाले, आम्ही महिलांचा अपमान केला. गुवाहाटीला आम्ही बाहेर होतो तेव्हा आमच्या महिला भगिनींचा कसा अपमान केला? कुठल्या भाषेत आम्ही बोललो? आम्ही महिलांचा सन्मान करणारे लोक आहोत. ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.