मोदींसमोर एकनाथ शिंदे भर मंचावर कुणावर बरसले? मुख्यमंत्र्यांकडून 2024 च्या निवडणुकीनंतर राजकारणात भूकंपाचे संकेत
"येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भूकंप येणार, आमच्या विरोधी पक्षाचे लोक त्याला झेलू शकणार नाहीत हे मी आताच सांगू इच्छितो", असं मोठं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज शिवडी-नाव्हा शेवा सागरी सेतूचं उद्घाटन झालं. यावेळी ते बोलत होते.
मुंबई | 12 जानेवारी 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज शिवडी-नाव्हा शेवा अटल सागरी सेतूचं उद्घाटन झालं. त्यानंतर नवी मुंबई विमानतळाच्या मैदानावर मोदींच्या हस्ते अनेक विकासकामांचं लोकार्पण झालं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनोगत व्यक्त केलं. एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात मोदी सरकारच्या योजनांचा पाढा वाचला. पण अटल सेतू विषयी बोलताना त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधला. अटल सेतूमुळे अहंकारी लोकांचा अहंकार मिटेल, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीच्या निकाल समोर आल्यानंतर राजकारणात मोठा भूकंप येईल. तो भूकंप विरोधक सहन करु शकणार नाहीत, असंही मोठं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं.
“आजचा दिवस आपला स्वप्नपूर्तीचा आहे. आज देशातील सर्वात मोठ्या सागरी सेतूचं लोकार्पण होतंय. नरेंद्र मोदी यांचं मी मनापासून स्वागत करतो. आज देशातला सर्वात मोठ्या लांबीचा सागरी पुलाचं उद्घाटन झालंय. याच सागरी सेतूचं भूमीपूजन नरेंद्र मोदींनी केलं होतं. त्याचं उद्घाटनही मोदींच्या शुभहस्ते होत आहे. मध्ये कोविडचा काळ गेला. कोविड काळातही या सेतूचं काम सुरु होतं. त्या काळात ज्या इंजिनियर आणि कर्मचाऱ्यांनी काम केलं त्यांचे धन्यवाद मानतो. दोन तासाचं अंतर फक्त २० मिनिटात कापलं जाणार आहे. आज खारकोपर, उरण रेल्वे मार्ग, दिघा रेल्वे स्टेशन, सूर्या योजना, अशा अनेक योजनांचं लोकार्पण होणार आहे. महिला सक्षमीकरणाचा शुभारंभ होणार आहे. हे सेतू अटली यांच्या नावासारखंच अटल आणि मजबूत आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
“येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भूकंप येणार, आमच्या विरोधी पक्षाचे लोक त्याला झेलू शकणार नाहीत हे मी आताच सांगू इच्छितो”, असं मोठं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं. अन्याय आणि अत्यार करणाऱ्या रावणाचा अंत करण्यासाठी श्रीरामांनी समुद्रात जसा रामसेतू उभारला होता, तसंच महाराष्ट्र सरकारने बनवलेल्या या अटल सेतूमुळे अहंकारी लोकांचा अहंकार मिटेल, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला. “अबकी बार 400 पार, फिर एक बार मोदी सरकार”, असा नारा एकनाथ शिंदे यांनी दिला.
“५०-६० वर्षात जे नाही केलं गेलं ते ९ वर्षात मोदींनी करुन दाखवलंय. भारताच्या अर्थव्यवस्थेला नव्या उंचीवर नेण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलंय”, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला. “हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचंही राम मंदिर व्हावं अशी इच्छा होती. त्यामुळे ते आज हयात असते तर त्यांनी मोदींचं कौतुक केलं असतं”, असंही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
अजित पवार यांच्याकडून मोदी सरकारच्या कामांचं कौतुक
“ज्या प्रचंड संख्येने आपण मोदींचं स्वागत केलं त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो. आजचा दिवस देश आणि महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा दिवस आहे. आज राजमाता जिजामाता यांची जयंती आहे. तसेच आज स्वामी विवेकानंद याची जयंती आहे. मी दोघांना वंदन करतो. २०१४ मध्ये मोदींनी देशाची कमान सांभाळली तेव्हा त्यांनी सर्वात जास्त लक्ष हे नारीशक्तीचं सशक्तीकरणाकडे दिलं होतं. उज्ज्वला योजनेतून महिलांच्या जीवनात प्रकाश आणण्याचं काम झालंय. भारताचा सर्वात मोठा सागरी सेतू महाराष्ट्र सरकारने बनवलं आहे ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. मोदी सरकारने निर्धारित वेळेत अनेक योजना पूर्ण केल्या आहेत. आता रायगडमध्ये तिसरी मुंबई वसणार आहे. शिवडी- नाव्हा शेवा अटल सेतूमुळे मुंबईला ग्रामीण भागाला जोडण्यास मदत होणार आहे”, असं अजित पवार म्हणाले.
“भारतात वंदे भारत सारख्या ट्रेन धावत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकाचं आयुष्य सोपं होत आहे. भारत एका नव्या मार्गावर चालत आहे. राजकारणात तुमचं लक्ष्य स्वच्छ असेल तर कितीही अडचणी आल्या तरी देशाच्या विकासासाठी तुम्हाला काम करत राहायचं आहे हे आपल्याला मोदींकडून शिकायचं आहे. आम्ही आज सकाळी नाशिकमध्ये युवा महोत्सवात सहभागी झालो. मोदीजी पहिले असे पतप्रधान आहेत ज्यांनी तरुणांना समजून घेतलं. स्किल डेव्हलपमेंट डिजीटल इंडिया, मन की बात सारखे उपक्रम राबवले. मोदी नेहमी उत्साहात असतात. आम्ही जेव्हा त्यांच्याजवळ समस्या घेऊन जातो तेव्हा ते हसतमुखाने आमच्या अडचणी सोडवण्यास मदत करतात. भारताला महाशक्ती होण्यास कोणी रोखू शकणार नाही. पुढच्या चार वर्षात मोदी सरकारने मोठं लक्ष्य ठेवलं आहे. यामध्ये महाराष्ट्राचं देखील योगदान असेल”, असं अजित पवार आपल्या भाषणात म्हणाले.
आजचा दिवस स्वप्नपूर्तीचा, फडणवीसांचा दावा
“नरेंद्र मोदी यांचं मन:पूर्वक स्वागत करतो. आजचा दिवस आपल्या सर्वांकरता स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. अटल सेतूचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे याचा मला अत्यंत आनंद आहे. मोदी यांच्या हस्तेच या अटल सेतूचा पाया खोदला गेला होता. ४० वर्षे काहीच झाले नाही. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर अटल सेतूच्या कामाचं लोकार्पण झालं होतं. मोदी सरकार आल्यानंतर अनेक विकासकामांना सुरुवात झाली”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
‘मोदी महाराष्ट्राच्या पाठीमागे पहाडासारखे उभे’
“जपान सरकार त्यावेळी खूप मोठं कर्ज देत होतं. आपण राज्य सरकारच्या बजेटमधून पैसे खर्च केले असते तर ग्रामीण भागात विकासकामे पोहोचले नसते. आम्ही मोदींना विनंती केली की, एमएमआरडीएला कर्ज द्या. त्यानंतर मोदींनी निर्णय घेऊन एमएमआरडीएला कर्ज दिलं आणि हा अटल सेतू निर्माण झाला. मेट्रो, रस्त्यांचं नेटवर्क असं होत आहे की पुढच्या तीन-चार वर्षात आपलं स्वप्न साकार होईल. आज ऑरेंट टनेलचं भूमीपूजन होत आहे. सूर्या योजनेचं उद्घाटन होत आहे. महाराष्ट्र आणि देशाला मुंबईने ताकद दिली. पण पुढचे 50 वर्ष रायगड आणि नवी मुंबईचा परिसर राज्याला ताकद देईल. आज या सेतूने या परिसराला अशी कनेक्टिवीटी दिली की त्याला कोणी रोखू शकत नाही. नवी मुंबई विमानतळाचं देखील यावर्षी उद्घाटन होईल. मोदी महाराष्ट्राच्या पाठीमागे पहाडासारखे उभे आहेत”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.