Uddhav Thackeray : “मिंध्या तु मर्दाची औलाद असलास…”, उद्धव ठाकरेंचं एकनाथ शिंदेना भरसभेत आव्हान
Uddhav Thackeray On Eknath Shinde: उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना बीकेसीतील जाहीर सभेतून ओपन चँलेज दिलंय. जाणून घ्या.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चा प्रचार अखेरच्या टप्प्यात आला आहे. प्रचारासाठीचे शेवटचे अवघे काही तास बाकी आहेत.अशात मतदारांना आपल्या बाजूने झुकवण्यासाठी आणि आपणच कसे पुढील 5 वर्षांत महाराष्ट्राच्या विकासासाठी योग्य आहोत हे दाखवून देण्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीतील पक्षांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे. सत्ताधारी आणि विरोधक हे अनेक जाहीर सभांमधून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांसह सडकून टीका करत आहेत. तसेच एकमेकांना ओपन चॅलेंजही देत आहेत. असंच एक आव्हान शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं आहे.
उद्धव ठाकरेंचं शिंदेना आव्हान काय?
“काल मी मिंध्यांना ठाण्यात आव्हान दिलं होतं, आज मी तुमच्या साक्षीनं देतोय. मिंध्या जर तु मर्दाची औलाद असलास, वाटत तर नाहीच. तर तु तुझ्या वडिलांचा फोटो लावून नावाने मैदानात ये आणि मग मतं नाही तर जनतेची जोडी खा”, असं उद्धव ठाकरे म्हणाले. बीकेसीत महाविकास आघाडीच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. उद्धव ठाकरे यांनी या सभेतून एकनाथ शिंदेंना हे आव्हान दिलं.
उद्धव ठाकरे ठाण्यात काय म्हणाले होते?
उद्धव ठाकरे यांनी शनिवारी 16 नोव्हेंबरला ठाण्यातील सभेतून बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या फोटोच्या वापरावरुन शिंदे गटावर टीका केली होती. “बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे बेनरवर फोटो लावता. मर्दाची खरी औलाद असाल तर स्वतःच्या वडिलांचे फोटो लावा आणि निवडणुका जिंकून दाखवा”,असं आव्हान ठाकरेंनी शिंदेंना दिलं होतं.
जाहीरातीतून डिवचलं सभेतून सुनावलं
उद्धव ठाकरे यांनी पाटणमध्ये झालेल्या जाहीर सभेतून नाव न घेता एकनाथ शिंदेंना जाहीरातीवरुनही सुनावलं. बाळासाहेबांचा फोटो लावत शिंदे गटाने वृत्तपत्रात जाहीरात दिली होती. “मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही”, शिंदे गटाने या जाहीरातीत बाळासाहेब ठाकरे यांच्या या वाक्याचा उल्लेख करत ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न केला.त्यावरुन “भाजपची कमळाबाई होऊन देईन” असं बाळासाहेब म्हणाले होते का? असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर टीकास्त्र सोडलं.
“आज शिवसेनाप्रमुखांचा स्मृतीदिन आहे. काही जाहीराती या गद्दारांनी दिल्या आहेत. गद्दारा पहिले तू माझ्या वडिलांचा फोटो वापरायचा सोड. नामर्दाची औलाद तुझ्यात हिंमत असेल तर स्वत:च्या वडिलांचा फोटो लाव आणि मग मत मागायला ये. मग कसे जोडे खातो ते बघ”, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला.