मुंबई : मुंबईतून आगीच्या घटनेची एक मोठी बातमी समोर आलीय. गोरेगाव पूर्व आयटी पार्कमागील जंगल परिसरात भीषण आग लागलीय. आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ही आग इतकी भीषण आहे की लांबूनही ही आग स्पष्टपणे दिसतेय. या आगीत शेकडो झाडं जळून खाक होण्याची भीती वर्तवली जातेय. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे शर्थीने प्रयत्न सुरु आहेत.
अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही आग लेव्हल 1 नंबरची आग आहे. आतापर्यंत कोणीही अडकलेलं नाही, अशी माहिती सध्या तरी समोर येतेय. आग नेमकी कशी लागली याचा तपास सुरू आहे.
विशेष म्हणजे ज्या जंगल परिसरात आग लागलीय तो परिसर हा संजय गांधी नॅशनल पार्कचा एक भाग आहे. या परिसरात बिबट्या, मोर, वानर, हरण असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे वन्यजीव आहेत. तसेच या परिसरात अनेक वनस्पती आहेत. पण या आगीच्या घटनेमुळे या वन्यजीवांना धोका निर्माण झालाय.