AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारी दिरंगाईने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मांडणाऱ्या ग्रंथाची कोंडी

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रशासनाची दुंमदुमी अख्ख्या युरोपात कशी होती याची महती 'महाराष्ट्र राज्य पोलीस' या ग्रंथात लेखक दिपक राव यांनी मांडली आहे.

सरकारी दिरंगाईने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मांडणाऱ्या ग्रंथाची कोंडी
dipakraoImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Nov 27, 2022 | 11:55 AM

अतुल कांबळे, TV9 मराठी, मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रशासकीय कारभारापासून प्रेरणा घेऊन ब्रिटीश गव्हर्नरांनी महाराष्ट्र पोलीस दलाची रचना कशाप्रकारे केली ? याचा लेखाजोखा मांडणा-या अमुल्य ग्रंथासाठी पोलीस दलाकडे आर्थिक तरतूद नसल्याने ही ग्रंथ निर्मिती रखडली आहे.

मुंबई पोलीसांचा इतिहास लिहीणारे दिपक राव यांनी ‘महाराष्ट्र राज्य पोलीस’ हा नवा ग्रंथ लिहीला आहे. त्यांनी या आधी मुंबई पोलीस आयुक्तालयाला 100 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘मुंबई पोलीस’ अशा नावाने देखणा ग्रंथ लिहीला होता. त्याचे प्रकाशन मुंबई पोलीस दलाचे तत्कालिन आयुक्त अनामी राॅय यांच्या हस्ते साल  2005 मध्ये  झाले होते.

‘महाराष्ट्र राज्य पोलीस’ या नव्या ग्रंथाची सर्व सज्जता झाली आहे. परंतू मधल्या काळात नेमके सरकार बदलल्याने छपाईच्या सर्व तयारीवर पाणी फेरले आहे. सत्ताबदलाच्या या गोंधळात काही काळ महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक पद  रिक्त राहीले. अतिरीक्त महासंचालकांना या  ग्रंथाच्या छपाईकरीता लागणा-या रकमेच्या मंजूरीचे अधिकारच नसल्याने ग्रंथाला प्रकाशित करण्यासाठी पैशाची तरतूद वेळेत झाली नाही. त्यामुळे या ग्रंथासाठी आता जादा रक्कम लागणार असून त्यासाठी सरकारला विनंती केली असल्याचे  दिपक राव यांनी टीव्ही नाइन मराठीशी बोलताना सांगितले.

प्रभू शिवरायांप्रमाणे एकही ‘उत्तम प्रशासक’ अख्ख्या युरोपात नसल्याची कबुली देणारा ब्रिटीशांचा दस्ताऐवज या नव्या ग्रंथात मांडला आहे. मुंबई ज्यावेळी सात बेटांची होती, त्यावेळी या बेटांवरील कायदा आणि सुव्यवस्था पाहण्यासाठी इंग्रजांनी ‘भंडारी मिलिशिया’ नावाने संरक्षक दल स्थापन केले होते. ब्रिटीशांनी भारतीय पोलीस दलाची निर्मिती करताना रँक आणि कायदे त्यांच्या पद्धतीने केले, परंतू प्रशासन चाेखपणे कसे चालवायचे याची मुळ प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांकडून कशी घेतली याची इंत्यभूत माहीती या नव्या ग्रंथात असल्याचे दिपक राव यांनी सांगितले.

मुंबई पोलीस दलाचे पहीले पोलीस आयुक्त म्हणून सर फ्रँक शुटर 1864-1888 यांनी काम पाहीले. ते ‘सिनियर मॅजिस्ट्रेट’ हाेते. देशात इतरत्र पोलीस महासंचालक ( डायरेक्टर जनरल ) पद अस्तित्वात आले असले तरी महाराष्ट्रात त्यासाठी काही कारणांनी सहा महिने उशीर लागला. आयजीपी हे पद डीजीपीमध्ये कन्हर्ट झाल्यानंतर सन 1982 मध्ये के.पी.मेढेकर हे महाराष्ट्र पोलीस दलाचे पहीले पोलीस महासंचालक झाले.

आयजी कार्यालय 1955-56 पर्यंत पुण्यात होते. नंतर बेलार्ड इस्टेट, सेशन कोर्ट तसेच सचिवालय असा प्रवास करीत कुलाब्यातील आताच्या देखण्या इमारतीत आले. ही इमारत रॉयल आल्फ्रेड सेलर्स हाेम म्हणून प्रसिद्ध हाेती. सीएसएमटी इमारतीचे आर्किटेक्ट फ्रेडरीक विल्यम स्टीव्हन यांनीच आता डीजी ऑफीस असलेल्या या इमारतीचे डीझाईन केले आहे,  पूर्वी राज्य विधिमंडळाचे अधिवेशन याच डीजी कार्यालयात भरायचे असे दिपक राव यांनी सांगितले.

पोलीस इतिहासाचे संशोधक म्हणून प्रसिद्ध असलेले दिपक राव पूर्वी चर्चगेट येथे रहायचे. आता ते 73 वर्षांचे असून सध्या ते मालाडला रहातात. त्यांनी अनेक पुस्तके लिहीली असून मुंबईचा ‘चालता बोलता इतिहास’ म्हणून त्यांना ओळखले जाते. सिल्वर कॉईन प्रकाशन ‘महाराष्ट्र राज्य पोलीस’ या ग्रंथाचे प्रकाशन करणार असून लवकरच त्याची छपाई सुरू होऊन ताे वाचकांच्या हाती पडेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.