शिंदे, अजितदादा गटाला किती जागा देणार?; देवेंद्र फडणवीस यांचा फॉर्म्युला काय?
आगामी लोकसभा निवडणूकीमध्ये जागावाटप हे कशाप्रकारे होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. काही जागांवरून दोस्तीत कुस्ती होण्याचीही शक्यता आहे. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : आगामी लोकसभा निवडणूकीआधी महायुती आणि मविआच्या जागावाटपाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आता राज्यातील राजकीय समीकरण बदलली आहेत. मुख्यमंत्रा एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिन्ही बडे नेते आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये महायुती मोठ्या ताकदीने उतरेल मात्र शिंदेंच्या शिवसेनेला, पवारांच्या राष्ट्रवादीला किती जागा मिळणार? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा असणार याबाबत टीव्ही9 मराठीच्या लोकसभा महासंग्राम या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस काय म्हणाले जाणून घ्या.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
आम्ही तिघं एकत्र बसतोय, तत्त्व एकच ठरवलं. जागांचं जास्त अडून धरायचं नाही. जो निवडून येईल त्याने लढवायचं. त्यामुळे तिघांसोबत न्याय होईल. संख्येसाठी लढत नाही. मोदींच्या पाठी महाराष्ट्र खंबीरपणे उभा राहिला पाहिजे. कुणाला किती जागा मिळते, कोण तिथे निवडून येईल या गोष्टी गौण आहे. भाजप कमळावर, शिंदे धनुष्यबाण आणि अजितदादा घडाळ्यावरच लढणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
जरागेंबाबत काय म्हणाले फडणवीस?
मी उपाशी होतो, ताबा सुटला असं जरांगे म्हणाले त्यामुळे सोडून द्या. जरांगे तर बिचारे नवीन आहेत. जेव्हा काही सापडत नाही तेव्हा शरद पवार साहेबही जातीवर जातात. संभाजीराजेंना तिकीट दिलं तेव्हा पूर्वी छत्रपती पेशवे नेमायचे आता पेशवे छत्रपती नेमत आहेत असं पवार म्हणाले होते. माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावता येत नाही त्यामुळे जातीवरून आरोप होतात. पण जातीपातीत महाराष्ट्र अडकणार नसल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.
मला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही- फडणवीस
मला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. महाराष्ट्राने स्वीकारलंय,. कोण मला सर्टिफिकेट देऊ शकतं. कुणाला अधिकार आहे सर्टिफिकेट द्यायचा. शिंदे साहेब म्हणाले ते योग्य आहे. महाराष्ट्राने मला स्वीकारलंय. त्यामुळे मी राज्यातील प्रत्येक समाजासाठी लढणार आहे. एखाद्या व्यक्तीने मला शिव्या दिल्या म्हणून मी थांबणार नाही. माझी जेवढी क्षमता आहे, तोपर्यंत मी काम करेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.