रविवारी मेट्रोने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, घरातून बाहेर पडण्यापूर्वी ही घ्या काळजी
मेट्रो 2 अ ( दहिसर – डी. एन. नगर ) आणि मेट्रो 7 (दहिसर – अंधेरी) मार्गिकेची संपूर्ण स्थापत्य तसेच प्रणालीची कामे पूर्ण झाली आहेत, लवकरच मेट्रो 2 अ आणि 7 चा दुसरा टप्पा मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल, त्यामुळे रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी होण्यास मदत होणार आहे.
मुंबई : मेट्रो 2 अ ( दहिसर – डी. एन. नगर ) आणि मेट्रो 7 (दहिसर – अंधेरी) मार्गिकेचा पहीला टप्पा सुरू झाला आता दुसरा टप्पा कार्यरत करण्यासाठी अभियांत्रिकी काम होत आहे. त्यासाठी रविवारी 8 जानेवारीला स. 6 ते रा.10 वाजेपर्यंत मेट्रोचा पहीला टप्पा बंद ठेवण्यात येणार आहे. मेट्रो मार्ग 2 अ आणि 7 पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी फेज 1 आणि 2 या दोन्ही मार्गिकांमध्ये एकात्मिक सिग्नलिंग प्रणाली कार्यरत करणे गरजेचे आहे. या प्रणालीची अंमलबजावणी आणि चाचणी करण्यासाठी सध्या कार्यान्वित असलेल्या पहिल्या टप्प्यांतील सेवा बंद करण्यात येणार आहे. त्यासाठी दिनांक 8 जानेवारी रोजी सकाळी 6 वाजे. पासून रात्री 10 वाजेपर्यंत दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात मेट्रो मार्ग 2 अ आणि 7 च्या डहाणूकरवाडी ते आरे दरम्यान पहिल्या टप्प्यात सुरू असलेली मेट्रो सेवा प्रवाशांसाठी उपलब्ध नसेल.
‘मेट्रो 2 अ’ आणि ‘मेट्रो 7’चा डहाणुकरवाडी–दहीसर–आरे कॉलनी असा एकूण 20 किमीचा पहिला टप्पा गेल्यावर्षी एप्रिलमध्ये तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सुरू करण्यात आला होता. ‘मेट्रो 2 अ’मधील डहाणूकरवाडी ते डी. एन. नगर आणि ‘मेट्रो 7’मधील आरे ते अंधेरी पूर्व असा दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार आहे.
ही मार्गिका पादचारी पुलाद्वारे मेट्रो मार्ग 1 ( घाटकोपर ते वर्सोवा ) मार्गासोबत जोडला जाणार आहे. त्यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या एका बाजूला तर पश्चिम रेल्वेच्या दोन्ही बाजूंना दहीसर आणि अंधेरी अशा संपूर्ण टप्प्यात मेट्रो चालविणे शक्य होणार आहे. तसेच मुंबई मेट्रो – 1 ( घाटकोपर ते वर्सोवा ) च्या मार्गावरील अंधेरी स्थानक आणि पश्चिम रेल्वेच्या दहीसर स्थानकाशी ही लाईन कनेक्ट झाल्याने तयार झालेला हा ‘रिंग रुट’ प्रवाशांना फायद्याचा ठरणार आहे, अशी माहिती एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी दिली.
मेगाब्लॉक दरम्यान कामाचे स्वरूप
• पब्लिक अनाऊंसमेंट सिस्टीम, पॅसेंजर इन्फॉर्मेशन डिस्प्ले सिस्टीम, सिग्नलिंग आणि टेलिकॉम सिस्टीमसह रोलिंग स्टॉक यांसारख्या सिस्टीमची एकात्मिक चाचणी करणे.• दुसऱ्या टप्प्यात चाचणी होत असलेल्या तसेच वापरण्यात येणाऱ्या अद्ययावत प्रणाली सोबत पहिल्या टप्पा कार्यरत करणे. • प्रवाशांच्या सुखकर प्रवासासाठी संपूर्ण प्रणालीची अखंडता आणि सुरक्षितता तपासणे.
मेट्रो – 7 वरील स्थानके मेट्रो -7 मार्ग दहिसर ( पूर्व ) ते अंधेरी ( पूर्व ) असा 16.5 किमीचा असून दहिसर (पूर्व), ओवरीपाडा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, देवीपाडा, मागाठाणे, पोईसर, आकुर्ली, कुरार, दिंडोशी, आरे, गोरेगाव (पूर्व), महानंद डेअरी, जोगेश्वरी ( पूर्व ), जेव्हीएलआर जंक्शन, शंकरवाडी, गुंदवली (अंधेरी-पूर्व) मेट्रो -2 (अ) वरील स्थानके मेट्रो मार्ग – 2 (अ) दहिसर ते डी.एन.नगर असा एकूण 18.6 कि.मी.चा आहे. या मार्गावर दहिसर ( पूर्व ), आनंद नगर, कांदरपाडा, मंडपेश्वर, एकसर, बोरीवली (पश्चिम), शिंपोली, कांदिवली (पश्चिम), डहाणूकरवाडी, वलणई, मालाड ( पश्चिम ), लोअर मालाड, पहाडी गोरेगाव, गोरेगाव (पश्चिम), ओशिवरा, लोअर ओशिवरा आणि डी.एन.नगर अशी स्थानके आहेत.