Tv9 Marathi Special Report | नितीन देसाई यांना धनुष्याबाणाच्या ‘त्या’ प्रतिकृतीतून काय सांगायचंय?
प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाईंच्या आत्महत्येमुळे सिनेसृष्टीत खळबळ उडालीय. नितीन देसाईंनी आत्महत्या का केली? याचा तपास सुरु आहे. मात्र मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्येआधी नितीन देसाईंनी ऑडिओ रेकॉर्डिंग केलंय. तो रेकॉर्डर पोलिसांच्या हाती लागलाय. तर आत्महत्येस्थळी धनुष्यबाणाची प्रतिकृती होती, अशीही माहिती स्टुडिओतल्या एका कामगारानं दिलीय.

मुंबई | 2 ऑगस्ट 2023 : प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई काळाच्या पडद्याआड गेले आहेत. नितीन देसाईंनी आपल्या एनडी स्टडुओतच गळफास घेत जीवनयात्रा संपवली. मात्र ऐवढा मोठा कला दिग्दर्शक आत्महत्या कसा काय करु शकतो? हाच प्रश्न त्यांच्याशी जुळलेले कलाकार आणि मराठी चित्रपट सृष्टीलाही पडलाय. पण मिळालेल्या माहितीनुसार, नितीन देसाईंनी ND स्टुडिओत काम करणाऱ्या एका तरुणाला मंगळवारी रात्री फोन केला आणि स्टुडिओत येऊन एक साऊंड रेकॉर्डर ऐक असं सांगितलं. हा साऊंड रेकॉर्डर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असून पोलीस त्यादृष्टिनं तपास करत आहेत.
नितीन देसाईंनी गळफास घेण्यापूर्वी जमिनीवर दोरीच्या साहाय्यानं एक धनुष्यबाणाची प्रतिकृती साकारली होती. धनुष्यबाणाचं टोक असलेल्या दिशेनं नितीन देसाईंनी गळफास घेतला, अशी माहिती गळफासानंतर पहिल्यांदा देसाईंना पाहणाऱ्या एका कामगारानं सांगितलंय. त्यामुळं धनुष्यबाणाची प्रतिकृती कशासाठी साकारली? आणि नेमकं नितीन देसाईंना त्यातून काय सांगायचंय? हा सवाल आहे. तसंच एक चिठ्ठीही सापडली असून त्यात अंत्यसंस्कार ND स्टुडिओतच करण्याची इच्छा नितीन देसाईंनी व्यक्त केलीय.
नितीन देसाई यांच्या आत्महत्येचं कारण काय?
नितीन देसाईंच्या आत्महत्येमागं आर्थिक विवंचनेचं कारण असू शकतं, अशी शक्यता वर्तवली जातेय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नितीन देसाईंनी 180 कोटींचं कर्ज घेतलं होतं. 180 कोटींची कर्जाची रक्कम व्याजासह आता 249 कोटीपर्यंत पोहोचली होती. कर्जवसूलीसाठी एडलवाईज कंपनीनं जिल्हाधिकाऱ्यांना एक प्रस्ताव दिला. देसाईंनी तारण ठेवलेली जमीन आणि मालमत्ता जप्त करुन कर्जवसूली करण्याचा हा प्रस्ताव दिला होता, अशी सूत्रांची माहिती आहे.
नितीन देईसाईंवर सरफेसी कायद्यांतर्गत कारवाई प्रलंबित होती. नुकतंच 25 जुलैला NCTL अर्थात नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल कोर्टानं एक ऑर्डरही दिली होती ज्यात कायदेशीर कारवाईच्या सूचना होत्या.
मनसेच्या रायगड जिल्हाध्यक्षांचा गंभीर आरोप
नितीन देसाईंचे मित्र आणि मनसेचे रायगडचे जिल्हाध्यक्ष यांनी गंभीर आरोप केलाय. देसाईंच्या ND स्टुडिओला शूटिंग मुद्दाम मिळू नये, यासाठीच कट रचला जात होता. याची माहिती नितीन देसाईंनीच आपल्याला दिली होती असं जितेंद्र पाटलांचं म्हणणंय.
नितीन देसाई यांची भव्य कारकीर्द
सिनेमांमधली भव्यदिव्यता नितीन देसाईंच्या नजरेतून साकारली जायची. मोठ मोठे इतिहासकालीन सेट उभारणारं असो… की मग हुबेबूब वाटणारी कलाकृती साकारण्यात नितीन देसाई माहीर होते. संजय लीला भन्साळी, विधु विनोद चोपडा, राजकुमार हिरानी, आशुतोष गोवारीकर यांच्या सिनेमांसाठी नितीन देसाई यांनी कला दिग्दर्शन केलं. लगान, देवदास, बाजीराव मस्तानी, जोधा अकबर, हम दिल दे चुके सनम, बालगंधर्व, हरिश्चंद्राची फॅक्टरी यासारख्या चित्रपटाचं कलादिग्दर्शन नितीन देसाईंनी केलं. चार वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, तर 3 वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनाचा फिल्मफेअर पुरस्कार नितीन देसाईंना मिळाला होता.
नितीन देसाईंनी 2005 मध्ये कर्जतमध्ये 52 एकरावर, ND स्टुडिओ साकारला होता. आलिशान आणि तितकाच भव्य असा हा स्टुडिओ आहे. अनेक चित्रपटामध्ये वापरलेले सेट इथं आजही दिसतात. बिग बजेट आणि ऐतिहासिक सिनेमांसाठी कलादिग्दर्शन एवढीच ओळख नितीन देसाईंची नव्हती. तर सर्वपक्षीय नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध होते आणि राजकीय व्यासपीठंही आपल्या कलेच्या नजरेतून त्यांनी साकारली.
राज ठाकरे यांच्याकडून श्रद्धांजली अर्पण
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी म्हटलंय की, “ज्येष्ठ कलादिगदर्शक आणि माझे स्नेही नितीन देसाई ह्यांच्या आत्महत्येच्या बातमीने मन सुन्न झालं. जवळपास 30 वर्ष हिंदी चित्रपटांच्या जगात एका मराठी कलाकाराने जी भव्यता आणि नजाकत उभी केली त्याला तोड नाही. कला दिग्दर्शकाच्या दृष्टीचा पैस हा मोठाच असावा लागतो आणि असा पैस असलेला माणूस आयुष्यात एका क्षणाला कमकुवत होतो, त्याला आयुष्यात पुढे काहीच दिसेनासं होतं आणि तो इतका टोकाचा निर्णय घेऊ शकतो, हे अनाकलनीय आहे.”
“नितीन हा धीराचा माणूस होता, कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाणारा माणूस होता, त्यामुळे त्याने असा आत्मघातकी विचार का केला असेल? त्याच्यावर ही वेळ कशामुळे आली असेल ह्याचा छडा लागला पाहिजे. असो, कोणावरही अशी वेळ येऊ नये हीच इच्छा. नितीन देसाईंना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची श्रद्धांजली”, असं राज ठाकरे म्हणाले.
आत्महत्येच्या दुर्दैवी निर्णयामुळं नितीन देसाईंसारखा उमदा कलाकार आपल्यातून निघून गेलाय. आत्महत्येमागं नेमकी कारणं काय? याचा तपास पोलीस करतायत. जो साऊंड रेकॉर्डर आहे, त्यात नितीन देसाईंनी काय म्हटलंय? आत्महत्येची काही कारणं सांगितली का? तपातून जे यायचं ते समोर येईलही, पण नितीन देसाई येणार नाहीत.