Lijjat Papad | लिज्जत पापडच्या संस्थापक जसवंतीबेन पोपट यांचे निधन, मुंबईतील सात जणींची प्रेरणादायी कहाणी
15 मार्च 1959 मध्ये मुंबईतून सात महिलांनी 80 रुपयांच्या भांडवलाआधारे लिज्जत पापडाची मुहूर्तमेढ रोवली होती. लाखो महिलांना रोजगार मिळवून त्यांना स्वत:च्या पायावर उभ्या करणाऱ्या जसवंतीबेन यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
मुंबई | 23 सप्टेंबर 2023 : मुंबईतील गिरगावातून पापडाचा व्यवसाय सुरु करीत लाखो महिलांना स्वावलंबी बनविणाऱ्या श्री महिला गृहउद्योग लिज्जत पापडच्या एक संस्थापक जसवंतीबन जमनादास पोपट ( वय 93 ) यांचे नुकतेच त्याच्या राहत्या घरी निधन झाले. गिरगावातील शंकर बारी लेन येथील ‘हलिया लोहाणा निवास या इमारतीत त्यांचे रहात होत्या. सात मैत्रिणीनी मुंबई लिज्जत पापड गृहउद्योगाची सुरुवात केली होती. त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
15 मार्च 1959 मध्ये मुंबईतून सात महिलांनी 80 रुपयांच्या भांडवलाआधारे लिज्जत पापडाची मुहूर्तमेढ रोवली होती. जसवंतीबेन पोपट यांनी त्यांच्या मैत्रीणींनी सुरुवातीला भुलेश्वर येथील व्यापाऱ्यांना त्यांचे पापड विकण्यापासून व्यवसाय सुरु केला होता. आज देश आणि परदेशात लिज्जत पापडाची निर्यात होते. जसवंतीबेन पोपट यांनी व्यवसायाबरोबरच महिलांच्या शिक्षण, आरोग्य, स्वच्छतेसाठी देखील कार्य केले आहे.
सात मैत्रिणीनी सुरु केला व्यवसाय
सात मैत्रिणी गच्चीवर पापड वाळत टाकत असताना त्यांना पापडाचा व्यवसाय करण्याची कल्पना सुचली. जसवंतीबेन जमनादास पोपट, पार्वतीबेन रामदास थोडानी, उमजाबेन नरनदास कुंडालिया, भानूबेन एन.टण्णा, लागूबेन अमृतलाल गोकणी, जयाबेन व्ही. विथालानी आणि दिवालीबेन लुक्का या सात महिलांनी हा व्यवसाय सुरु केला. त्यांनी एकत्र येत लावलेले रोपट्याचे रुपांतर आज लाखो महिलांना रोजगार देणाऱ्या वटवृक्षात झाले आहे. आज 45 हजार महिला कर्मचारी 4.8 अब्ज पापडाची निर्मिती करतात. लिज्जतच्या 17 राज्यात 82 शाखा आहेत. अमेरिका, जपान ते साऊथ आफ्रिका अशा 25 देशात लिज्जतची पापड आणि इतर उत्पादने निर्यात होतात.