आजपासून म्हणा… जय…: मनसेच्या स्टेजवर जावेद अख्तर यांचा कोणता नारा?
तुम्ही एका व्यक्तीपासून प्रभावीत असाल तर तुम्ही त्यांना कॉपी कराल. पण अनेक लोकांपासून प्रभावित असाल तर तुम्ही ओरिजिनल होता. आम्हाला गंगा जमुना, मदर इंडिया सिनेमे आवडायचे आणि इतरही सिनेमे आवडायचे. आम्ही परदेशी सिनेमेही पाहायचो. त्यातूनच आम्ही घडत गेलो. आम्ही कुणी एकाची कॉपी केली नाही. सर्वांकडे जे जे घेण्यासारखं होतं ते घेतलं. खूप सिनेमे पाहिले आणि घडलो, असं जावेद अख्तर म्हणाले.
नंदकुमार गावडे, टीव्ही9 प्रतिनिधी, मुंबई | 9 नोव्हेंबर 2023 : राम आणि सीता हे केवळ हिंदू देव देवता नाहीत. तर तो भारताचा सांस्कृतिक वारसा आहे. मी नास्तिक असलो तरी राम आणि सीता हे मला या देशाची संपत्ती वाटते. त्यामुळे मी इथे आलो. रामायण ही आपली सांस्कृतिक मालमत्ता आहे. आपल्या आस्थेचा विषय आहे. मी राम आणि सीतेच्या देशात जन्माला आलो याचा मला अभिमान आहे, असं सांगतानाच जेव्हा आपण मर्यादा पुरुषोत्तमची गोष्ट करतो तेव्हा ते राम आणि सीता हेच समोर येतात. म्हणून आजपासून जय सियाराम म्हणा, असं आवाहनच प्रसिद्ध संवाद लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी केलं.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आयोजित केलेल्या दीपोत्सवाच्या कार्यक्रमात जावेद अख्तर यांनी हे आवाहन केलं. मी लखनऊचा राहणारा आहे. लहानपणी मी पाहायचं जे श्रीमंत लोक होते. ते गुड मॉर्निंग म्हणायचे. पण रस्त्यावरून जाणारा सामान्य माणूस जय सियाराम म्हणायचा. त्यामुळे सीता आणि राम यांचा वेगळा विचार करणं हे पाप आहे. सियाराम हा शब्द प्रेम आणि एकतेचं प्रतिक आहे. सिया आणि राम यांना फक्त एकानेच केलं होतं. त्याचं नाव होतं रावण. त्यामुळे जो वेगळं करेल तो रावण असेल. म्हणून तुम्ही माझ्यासोबत तीन वेळा जयसियारामचा नारा द्या. आजपासून जय सियारामच म्हणा, असं जदजावेद अख्तर म्हणाले.
अन् गब्बरचा जन्म झाला
यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांना शोले सिनेमाच्या अनुषंगाने प्रश्न विचारला. डॅनी यांनी गब्बरचा रोल केला असता तर काय फरक पडला असता? असा सवाल त्यांनी केला. त्यावर जावेद अख्तर यांनी गब्बर नाव कसं आलं याचा किस्साच सांगितला. सलीम खान यांचे वडील पोलीस दलात होते. त्यामुळे सलीम हे सतत गब्बर नावाच्या डाकूचं बाबत सांगायचे. त्यांचे वडील त्यांना गब्बरचे किस्से सांगायचे त्यामुळे सलिम मला सांगायचे. ते म्हणायचे गब्बर असा होता तसा होता.
गब्बर कुत्रे पाळतो वगैरे वगैरे. जेव्हा आम्ही शोलेची कथा लिहित होतो. तेव्हा मी सलिम यांना त्या डाकूचं नाव विचारलं. त्यांनी गब्बर म्हणून सांगितलं. मग मी म्हटलं आपण गब्बर हेच नाव सिनेमातील डाकूचं ठेवू. त्यांनी सांगितलेलं नाव मी सिनेमात घ्यायला सूचवलं आणि गब्बरचा जन्म झाला, असं जावेद अख्तर म्हणाले.
अन् अमजद खान फायनल झाले
त्यानंतर मी एका यूथ फेस्टिव्हलला गेलो होतो. तिथे अमजद खान नाटकात काम करत होते. मी त्यांच्या कामाची सलीमकडे स्तुती केली. त्यावेळी गब्बरच्या रोलसाठी डॅनीला ऑफर करण्यात आली होती. पण ते अफगाणिस्तानात धर्मात्माच्या शुटिंगमध्ये व्यस्त होते. त्यांना परदेशात फिरण्याची आवड असावी म्हणून त्यांनी धर्मात्मा स्वीकारला. शोले नाकारला.
मग गब्बरचा रोल कोण करणार असा प्रश्न उभा राहिला. तेव्हा तू अमजद खानच्या कामाची स्तुती करतोस मग त्याला का सिनेमात घेत नाही, असं सलीम म्हणाले आणि अशा प्रकारे अमजद खान यांची शोलेत एन्ट्री झाली. म्हणजे सलीम यांनी गब्बरचे किस्से ऐकवले आणि मी गब्बर हे नाव सिनेमात घेतलं. तर मी अमजद खान यांचं काम सांगितलं आणि सलीम यांनी त्यांचं नाव सूचवलं, असं ते म्हणाले.