मलिकांसाठी राष्ट्रवादी रस्त्यावर उतरली, केंद्र सरकारच्या कारवाया राजकीय सूडभावनेतून- जयंत पाटील
आजपासून राज्यभरात महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षांच्यावतीने आंदोलने करण्यात येतील अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी माध्यमांशी बोलताना केली.
मुंबई : नवाब मलिक (Nawab malik) यांना ईडीने (Ed)अटक केल्यानंतर राष्ट्रवादी रस्त्यावर उतरली आहे. सर्व कारवाया सुडाच्या भावनेतूनच होत आहेत तर काही लोक षडयंत्र रचून राज्यातील प्रमुख नेत्यांना नामोहरम करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचा निषेध करण्यासाठी आजपासून राज्यभरात महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षांच्यावतीने आंदोलने करण्यात येतील अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी माध्यमांशी बोलताना केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आज केंद्रीय सत्ताधाऱ्यांच्या सुडाच्या राजकारणाविरोधात मुंबईच्या चेंबुर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. महाराष्ट्रात ज्या सूडबुद्धीने केंद्रीय यंत्रणांचा वापर केला जातोय त्याविरोधात राज्यात आणि देशात जनभावना तीव्र आहे. जनता याबाबत नाराजी व्यक्त करत असून राजकीय सूडभावनेची कारवाई भाजपालाही न परवडण्यासारखी आहे असा टोला जयंत पाटील यांनी भाजपाला लगावला.
केंद्राविरोधात बोलल्याने टार्गेट
नवाब मलिक यांनी सार्वजनिक जीवनात तीस वर्षे घालवली आहेत. त्यांच्यावर झालेली कारवाई केवळ ते केंद्र सरकारविरोधात बोलत असल्यामुळे होत आहे. यासाठी नवाब मलिक यांचा आतंकवादाशी संबंध लावून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे असा आरोपही जयंत पाटील यांनी यावेळी केला. ईडी, आयकर विभाग या केंद्रीय यंत्रणा ज्याप्रकारे काम करत आहेत, या सर्व कारवाया सुडाच्या भावनेतूनच होत असल्याचे महाराष्ट्राच्या जनतेला कळून चुकलं आहे. महाविकास आघाडी सरकारने या भूमिकेचा निषेध व्यक्त केला आहे असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादीचा आक्रमक पवित्रा
यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, मुंबई युवक अध्यक्ष निलेश भोसले, मनपाच्या गटनेत्या राखी जाधव, युवती प्रदेश उपाध्यक्षा सना मलिक आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात उपस्थित होते. नवाब मलिक यांच्या अटकेनंतर आता भाजप आणि महाविकास आघाडी पुन्हा आमनेसामने आले आहेत. दोन्ही बाजुने आरोपांचे वार सुरू आहेत. त्यामुळे राज्यातलं वातावरण सध्या तापलं आहे. येणाऱ्या काळात हा संघर्ष आणखी वाढू शकतो.
मुसलमान म्हणजे दहशतवाद्यांशी संबंध आहेच असं होत नाही, बापासाठी लेक मैदानात; सना मलिक यांची निदर्शने