राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह गेल्यावर शरद पवार गटाचं नवीन चिन्ह काय? आव्हाड स्पष्टच म्हणाले…
New symbol of Sharad Pawar group : शरद पवार यांना मोठा धक्का बसला असून आता शरद पवार गटाचं नवीन नाव आणि चिन्ह काय असणार यावर जितेंद्र आव्हाड यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : महाराष्ट्राच्य राजकारणात मोठा उलटफेर झालेला पाहायला मिळत आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांच्याकडे दिलं आहे. शरद पवार गटाला आता नव्या चिन्हाची घोषणा करावी लागणार आहे. या निकालामुळे शरद पवारा गटाला मोठा धक्का बसला आहे. तर अजित पवार गटासाठी हा मोठा विजय असल्यासारखा आहे. निवडणूक आयोगाच्या निकालावर शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. हा निर्णय होणार हे आपल्याला आधीच माहित असल्याचं म्हणत आव्हाडांनी नवीन चिन्हाबाबत स्पष्टपणे सांगितलं आहे.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
आश्चर्य वाटत नाही. ज्या दिवशी आमची राष्ट्रीय मान्यता काढली तेव्हाच आमच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. पुढे काही तरी घडणार आहे. पुढे तसं तसं घडलं. आम्ही निवडणूक आयोगाला सर्व सांगून पटवून दिलं होतं. एकही मुद्दा राहिला नव्हता. चिन्ह आणि पक्ष काढून घेणार हे माहीत होतं. पक्ष आणि चिन्ह काढून घेण्याच्या अटीवरच हे सर्व झालं आहे. हा विश्वास दिला आहे. चिन्ह आणि पक्ष तुमच्या ताब्यात देऊ असा विश्वास दिला होता, असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला.
आमचं नवं आणि नवं नाव हे शरद पवार आहेत. कुणाच्या जीवावर निवडणुका जिंकल्या? अजित पवार, सुनील तटकरे कोणामुळे ओळखले जातात. मी काल जे बोललो मरण यातना देत आहेत त्या माणसाला ज्या माणसाने हे बाळ जन्माला घातलं, संगोपण केलं, त्याला न्हाऊ घातलं. त्याला सुसंस्कृतपणा दिला ते सर्व ओढून घेतलं. त्याचं दुख होत नसेल का त्यांना. ज्यांनी पक्ष स्थापन केला त्यांनीच तटकरेंपासून अजित पवार यांना मंत्रीपद दिलं. कुणाच्या बळावर, पवारांच्याच जीवावर ना असा सवाल करत आयोगाने दिलेल्या निर्णयावर आव्हाडांनी नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, शरद पवार गटाकडून पक्ष काढुन घेण्याचा निर्णय निवडणुक आयोगाने दिला. आमदार तिकडे जास्त म्हणुन निकाल दिल्याचे सांगताहेत. पवार साहेबांनी मोठी माणसे घडवली.आज तोच पक्ष हिसकावून घेतला जातोय. सुप्रिम कोर्टात जाणार आहे, आम्हाला मोठी आशा असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.