जितेंद्र आव्हाड यांना पुन्हा बळीचा बकरा बनवू नये, ऋता आव्हाड असं का म्हणाल्यात?
जोपर्यंत उद्या अकरा वाजता अंतरिम केस बोर्डावर येत नाही, तोपर्यंत पोलिसांनी कुठंल्याही प्रकारची कारवाई करू नये.
मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड म्हणाल्या, गेल्या दोन-तीन दिवसांपासून खूप गंभीर प्रकरणं सुरू आहेत. छोट्याशा कारणावरून विनयभंग दाखल होऊ शकतो, तर काहीचं अशक्य नाही. आम्हाला अशी माहिती मिळाली की, पोलीस संरक्षण मिळावं म्हणून आव्हाड साहेबांच्या नावानं धमकीचे फोन आले असे दाखविण्यात येत आहे. त्यानंतर संरक्षणासाठी अर्ज दाखल करायचा. त्यामुळं त्यांना पोलीस संरक्षण मिळेलच. कारण हल्ली अशा लोकांना पोलीस संरक्षण मिळतं, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी केली.
त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. पण, त्यासाठी पुन्हा एकदा आव्हाडांना बळीचा बकरा बनविण्यात येऊ नये. यासाठी मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक यांना एक निवेदन दिलंय. कोणतीही कारवाई करण्यापूर्वी पोलिसांनी योग्य ती शहानिशा करावी. आम्हालासुद्धा तपासात मदत करायला वेळ मिळावा. कोर्टानं असं सांगितलं आहे की, जोपर्यंत उद्या अकरा वाजता अंतरिम केस बोर्डावर येत नाही, तोपर्यंत पोलिसांनी कुठंल्याही प्रकारची कारवाई करू नये. ऋता आव्हाड म्हणाल्या, आम्ही पोलिसांत असताना हा आदेश आला आहे.
अंजली दमानिया यांच्यापासून सगळ्यांनी सांगितलं की, हा विनयभंग नाही. विनयभंग होण्याचे निकष इथं कुठंही पाहिले गेलेले नाहीत. हा सगळा राजकीय कट होता. त्यासाठी त्यांनी एका महिलाचा सहारा घ्यावा लागला. घटना घडली तेव्हा, मुख्यमंत्री समोर होते मग ते काही सांगत का नाहीत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
आव्हाड यांनी एक-दोन जणांना हातानं बाजूला केलं, असं व्हिडीओत दिसत आहे. गर्दीत हातानं बाजूला करणं म्हणजे विनयभंग होय का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शिवाय जितेंद्र आव्हाड यांना तीन वेळा मतदारांनी निवडून दिलं. आता त्यांनीचं काय ते ठरवावं, असंही त्या म्हणाल्या.