‘आरे’तील वृक्षतोडीला समर्थन, राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचा राजीनामा घ्या, सुप्रिया सुळेंकडे मागणी
मुंबई मेट्रो कारशेडसाठी 'आरे'तील झाडं कापण्याच्या प्रस्तावाला समर्थन दिल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नगरसेवक कप्तान मलिक यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे करण्यात आली
मुंबई : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) मेट्रो कारशेडसाठी ‘आरे’मधील वृक्षतोडीबाबत माहिती घेण्यासाठी गेल्या होत्या, त्यावेळी, ‘आरे’तील झाडं कापण्याच्या प्रस्तावाला (Aarey Metro Car shed) समर्थन दिल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नगरसेवक कप्तान मलिक (Kaptan Malik) यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
मी सकाळी कप्तान मलिक यांच्याशी बोलले. मी त्यांना विनंती केली की पक्षाच्या वतीने तुम्ही आम्हाला स्पष्टीकरण द्या की तुम्ही ही भूमिका का घेतली, असं उत्तर सुप्रिया सुळे यांनी दिलं. कप्तान मलिक हे 2007 पासून मुंबई महापालिकेत नगरसेवक आहेत. कलिना मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.
लहानपणापासून मी माझ्या आई-वडिलांबरोबर रविवारचा दिवस किंवा सुट्टीसाठी इथे यायचे. पर्यावरणाचा प्रश्न जगात गंभीर होत आहे. एकीकडे आपण हजारो झाडे लावायचा प्रयत्न करत आहोत, आणि दुसरीकडे अशी झाडं तोडतोय, याबद्दल सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त केली.
आम्ही पर्यावरणाच्या बाजूने आहोत. मुंबई महापालिकेमध्ये राष्ट्रवादीच्या माध्यमातून आम्ही विरोध केलेला आहे. सरकार एक गोष्ट सांगतं आणि पर्यावरण प्रेमी दुसरी. त्यामुळे नेमका मुद्दा काय आहे, समजून घेण्यासाठी मी इथे आले आहे, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.