टीव्ही9 इम्पॅक्ट : हिंदमाता पुलाखाली केईएमच्या रुग्णांचे हाल, महापौरांकडून अखेर वांद्र्यात व्यवस्था
टाटा कॅंसर हॉस्पिटल आणि केईएम रुग्णालयातील जवळपास 50 रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना हिंदमाता पुलाखाली हलवण्यात आलं होतं. (KEM Patients under Hindamata Flyover)
मुंबई : हिंदमाता पुलाखाली रवानगी केलेल्या टाटा कॅंसर हॉस्पिटल आणि मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयातील रुग्णांची व्यथा सरकार दरबारी पोहोचली आहे. वांद्र्यातील उत्तर भारतीय सभागृहात या रुग्णांना दाखल केलं जाणार आहे. ‘टीव्ही9 मराठी’ने दाखवलेल्या बातमीची महापौर किशोरी पेडणेकर यांनी दखल घेतली. (KEM Patients under Hindamata Flyover)
टाटा कॅंसर हॉस्पिटल आणि केईएम रुग्णालयातील जवळपास 50 रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना हिंदमाता पुलाखाली हलवण्यात आलं होतं. मुंबईत कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे पालिका रुग्णालयातील गर्दी कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेने हा निर्णय घेतला होता.
टाटा कॅंसर हॉस्पिटल आणि केईएम रुग्णालयातील रुग्णांची उड्डाणपुलाखालील तात्पुरत्या जागेची व्यवस्था करण्यात आली होती. बीएमसी त्यांना दिवसातून दोनदा जेवण उपलब्ध करुन देत होती. शहराबाहेरुन हॉस्पिटलला आलेल्या मात्र लॉकडाऊनमुळे अडकलेल्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची मुंबईच्या हिंदमाता पुलाखाली सोय करण्यात आली होती. मात्र त्यांचे हाल होत असल्याचा आरोप केला जात होता. तिथे ना पोलिसांची गस्त होती, ना पुरेशा डॉक्टर-नर्सची सुविधा. विशेष म्हणजे, केमोथेरपीचे रुग्णही पुलाखाली निपचित पडले होते.
हेही वाचा : डॉक्टर, नर्स ते वार्डबॉय, दादरच्या शुश्रुषा रुग्णालयात 8 कर्मचाऱ्यांना ‘कोरोना’
नाश्त्यासाठी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकंच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. परळ भाग हा मुंबईच्या हॉटस्पॉट परिसरापैकी एक असल्याने ‘हाय रिस्क’ रुग्णांविषयी ‘टीव्ही9 मराठी’ने चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर रुग्णांची विचारपूस करायला पोहोचल्या. ‘कोविड 19’ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने कठोर निर्णय घेतल्याचा दावा महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला.
भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्याही हिंदमाता ब्रिजखाली गेले होते. इथे व्यवस्था केलेल्या रुग्णांची विचारपूस करण्यासाठी सोमय्या अक्षरशः धावून आले होते. अखेर वांद्र्यातील उत्तर भारतीय सभागृहात या रुग्णांना दाखल केलं जाणार आहे.
VIDEO : Corona Breaking | TV9च्या बातमीची महापौरांकडून दखल https://t.co/okDYXqfbic
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 12, 2020
(KEM Patients under Hindamata Flyover)