Ketaki Chitale : केतकी चितळेला आज कोर्टात हजर करणार! वादग्रस्त फेसबुक पोस्टमुळे अडचणी आणखी वाढणार?
केतकी चितळेविरोधात आतापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल (Thane Police) झाले आहेत. तिला आज कोर्टात हजर केलं जाईल.
मुंबई : अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) आणि वाद हे आता नेहमीचच होऊन बसलंय. कारण शुक्रवारी केतकी चितळेने राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत एक वादग्रस्त पोस्ट केली आणि त्यानंतर पुन्हा नवा वाद सुरू झाला. केतकी चितळेविरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि नेते पेटून उठले. त्यानंतर केतकी चितळेविरोधात गुन्हे दाखल व्हायची मालिका सुरू झाली. मात्र ही मालिका अजूनही थांबली नाही. केतकी चितळेविरोधात आतापर्यंत एकूण पाच ठिकाणी गुन्हे दाखल (Thane Police) झाले आहेत. त्यात पुणे, ठाणे, नाशिक, धुळे आणि गोरेगावचा समावेश आहे. पोलीस तिला कोर्टात हजर करणार आहेत. त्यानंतर कोर्टात तिला दिसाला मिळतोय की अडचणी आणखी वाढणार? याकडे सर्वांत लक्ष लागलं आहे. केतकी चितळे प्रकरणाच्या तपासाबाबत पोलिसांनीही माहिती दिली आहे.
DCP लक्ष्मीकांत पाटील काय म्हणाले?
केतकी चितळे हीच्यावर कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो गुन्हा वर्ग करून गुन्हे शाखा युनिट 1 कडून अटक केली आहे. त्याची चौकशी करण्यात येणार आहे. नवी मुंबई, कळंबोली पोलिस हद्दीतून तिला गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. गुन्ह्यातील इतर तपास देखील गुन्हे शाखा करणार आहे. कृष्णा कोकणी यांनी योग्य तपास केला आहे. आवश्यक पुरावा उपलब्ध झाल्यामुळे योग्यरित्या कायद्याचे पालन करून नोटीस देत तपास करत आहे. तिला उद्या ठाणे न्यायालयात हजर करणार आहे. तपासासाठी पुढील प्रक्रिया राबवणार आहे. तसेच सध्या केतकी चितळे ही आरोपी आहे. कोणाच्या वॉलवरून ही पोस्ट घेतली त्याचा देखील तपास करण्यात येणार आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
निखिल भामरेही ताब्यात
तसेच नौपाडा पोलिसांत देखील निखिल भामरे यांच्याबाबत गुन्हा दाखल आहे. नाशिक पोलिसांनी निखिल भामरे यांना ताब्यात घेतले आहे. त्याबाबत देखील आम्ही माहिती घेऊन तपास घेऊन गुन्हे शाखा टीम नाशिक येथे जाणार आहे . असेही DCP लक्ष्मीकांत पाटील म्हणाले आहेत.
कोर्टात काय होणार?
कोर्टात हजर केल्यावर केतकी चितळेला जामीन मिळतो की कोठडी मुक्काम वाढतो, हेही पाहणं महत्वाचं ठरलं आहे. तसेच इतर ठिकाणी जे गुन्हे दाखल झाले आहेत. त्याही गुन्ह्यात केतकी चितळेचा पोलीस ताबा मागणार का? हाही सध्या गुलदस्त्यातला विषय आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी नेत्यांनी मात्र केतकी चितळेवर टीकेची झोड उडवली आहे.