Waterfall Tourist Spots : खोपोलीच्या Zenith आणि आडोशी धबधब्यावर जाण्याआधी ही बातमी वाचा, काय आहेत निर्बंध?
Waterfall Tourist Spots : पावसाळा सुरु झाला की, आपसूकच पर्यटकांची पावल धबधब्याकडे वळतात. वीकेंण्डला मुंबई-पुण्याजवळचे धबधबे पर्यटकांनी फुल्ल असतात. अनेकदा निसर्गाचा मनसोक्त आनंद घेण्यापेक्षा उपद्रव जास्त दिला जातो.
मुंबई : आता कुठे पावसाला सुरुवात झालीय. अजून पावसाने जोर पकडलेला नाही. मान्सून पूर्णपणे सक्रीय झाल्यानंतर नदी, तलाव, धबधबे ओसांडून वाहू लागतात. अशावेळी आपसूकच मुंबई, पुण्यातील पर्यावरण प्रेमींची पावलं धबधब्यांकडे वळतात. मुंबई जवळ असलेला खोपोलीतील झेनिथ आणि आडोशी धबधबा प्रसिद्ध आहे. मागच्या काही वर्षात झेनिथ आणि आडोशी धबधब्यावर अनेक पर्यटकांनी प्राण गमावले आहेत.
यंदा खबरदारी म्हणून प्रशासनाने पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आधीच काही पावलं उचलली आहेत. दुर्गम भागात असणाऱ्या, पावसाळ्यातील या टूरिस्ट पॉइंटमुळे काहीवेळा पर्यटकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होतो.
काय आहे ऑर्डर?
कर्जत-रायगड जिल्ह्याच्या उप विभागीय मॅजिस्ट्रेटने कलम 144 (1) अंतर्गत ऑर्डर जारी केली आहे. 15 ऑगस्ट 2023 पर्यंत ही ऑर्डर लागू राहील. या आदेशातंर्गत पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी काही गोष्टींवर निर्बंध असतील. धबधबा परिसरात दारुची वाहतूक, दारु पिणं यावर पूर्णपणे बंदी आहे.
सेल्फी काढताना तसच शूटिगं करताना सुद्धा काही दुर्घटना घडल्या आहेत. हीच बाब ध्यानात घेऊन सेल्फी घेणं, शूटिंग, खोल पाण्यात स्विमिंग यावर बंदी घालण्यात आली आहे.
अजून कशावर बंदी आहे?
पर्यावरण स्थळी प्रदूषण होऊ नये, यासाठी अन्न फेकणं, कचरा करणं, ग्लास, प्लास्टिक बॉटल्स, थरमाकॉल आणि अन्य वस्तू सार्वजनिक स्थळी वापरण्यास बंदी आहे. महिलांना त्रास दिला किंवा त्यांना पाहून चुकीची कृती केली तसच मोठ्या आवाजात म्युझिक वाजवणं, ज्यामुळे ध्वनि प्रदूषण होईल या सगळ्यावर बंदी घालण्यात आली आहे.
वाहतुकीसाठी काय निर्णय?
अनेकदा धबधबा असलेल्या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यासाठी वाहतुकीच्या नियमनासंदर्भातही काही सूचना आहेत. धरण, तलाव आणि धबधब्यापासून 1 किमीच्या परिसरात दोन चाकी, चार चाकी आणि बस गाड्यांना बंदी आहे. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी ही पावल उचलण्यात आली आहेत. मागच्या मान्सूमध्ये झेनिथ धबधबा परिसरात तीन पर्यटकांचा मृत्यू झाला होता. नदी पट्ट्यात पर्यटक अडकून पडल्याच्या सुद्धा घटना घडल्या आहेत. त्यामुळे खोपोली प्रशासनाने आतापासूनच पावल उचलली आहेत.