किरीट सोमय्यांच्या मुलाची 14 महिन्यांत पीएचडी?, मुंबई विद्यापीठाच्या हायस्पीड कारभाराची चर्चा
यासंदर्भात मुंबई विद्यापीठाकडं तक्रारही करण्यात आली आहे.
मुंबई : किरीट सोमय्यांच्या मुलाच्या पीएचडीची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. सोशल मीडियातील व्हायरल दाव्यानुसार, किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांनी अवघ्या 14 महिन्यांत पदवी मिळविली. फाईल्स आणि कागदपत्र दाखवून दीड डझन नेत्यांमागे चौकशीचा ससेमीरा लावणाऱ्या किरीट सोमय्या यांच्या मुलाच्या पीएचडीची पदवी वादात आली आहे. सोशल मीडियात व्हायरल झालेल्या पदवीनुसार, नील सोमय्या यांनी फक्त 14 महिन्यांत पीएचडी मिळविली. व्हायरल कागदपत्रांमुळं नील सोमय्यानी ऑगस्ट महिन्यात प्रबंध सादर केला. त्यानंतर दीड महिन्यात म्हणजे ऑक्टोबरमध्ये तोंडी परीक्षा घेण्यात आली. विशेष म्हणजे या तोंडी परीक्षेच्या दुसऱ्याचं दिवशी पीएचडी पदवी मुंबई विद्यापीठाकडून प्रदान करण्यात आली.
पदवीदान समारंभाचे काही फोटो नील सोमय्यांनी त्यांच्या सोशल अकाउंटवरून शेअर केलेत. ज्या वेगानं पीएचडी झाली. ज्या वेगानं मुंबई विद्यापीठाकडून पदवी प्रदान करण्यात आली त्या वेगावर नेटकरी प्रश्न उपस्थित करतात. या संदर्भात दोन्ही बाजूनं दोन कागदपत्र समोर आली आहेत.
17 सप्टेंबर 2016 ला नील सोमय्यांनी परीक्षा दिल्याचा दावा आहे. दुसरा कागद नील सोमय्यांच्या पीएचडीच्या पूर्ण कार्यक्रमाचा आहे. यात पीएचडी रजीस्ट्रेशनची तारीख जून 2021 ची आहे.
यासंदर्भात मुंबई विद्यापीठाकडं तक्रारही करण्यात आली आहे. मात्र, सारं काही नियमात केल्याचा दावा केला जातोय. विरोधकांनीही सोमय्याच्या मुलाच्या पीएचडीच्या वेगावर आश्चर्य व्यक्त केलंय. 14 महिन्यांचा आरोप खोडून काढत पीएचडीसाठी 72 महिने लागल्याचं किरीट सोमय्यांनी सांगितलं.