डर अच्छा है… किशोरी पेडणेकर असं का म्हणाल्या? कुणाला उद्देशून म्हणाल्या?
पत्रकारांनी चांगले केले तरी वाईट. तुमच्या खोट्या बातम्यांसाठी त्यांना वापरून घेता. तुम्ही काहीही कराल आणि नंतर माफी मागून मोकळे व्हाल हे चालणार नाही.
मुंबई: ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी भाजप नेते आणि राज्यातील तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. डर अच्छा है… लोकशाहीमधला डर अच्छा है, अशा शब्दात किशोरी पेडणेकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे. जे घडले त्याचा निषेध आम्ही सर्वानी केला आहे. तंत्रशिक्षण मंत्री हे मराठीतील इतर शब्द वापरू शकले असते. मात्र त्यांना इतरांना तुच्छ लेखायची सवय आहे. आता त्याचाच विविध मार्गाने निषेध होत आहे, असा टोला किशोरी पेडणेकर यांनी लगावला आहे.
किशोरी पेडणेकर या मीडियाशी संवाद साधत होत्या. पत्रकारांनी चांगले केले तरी वाईट. तुमच्या खोट्या बातम्यांसाठी त्यांना वापरून घेता. तुम्ही काहीही कराल आणि नंतर माफी मागून मोकळे व्हाल हे चालणार नाही, असा इशाराच किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे.
दरम्यान, मुंबई महापालिकेतील महाविकास आघाडीच्या माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे महापालिकेतील कारभाराविरोधात तक्रारीचं पत्रं लिहिलं आहे. बीएमसीमध्ये सध्या प्रशासक म्हणून काम बघत असलेल्या आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या कार्यकाळात सुरू असलेल्या कामांमुळे आणि निर्णयांमुळे बीएमसीचा दर्जा खालावत असल्याची तक्रार या पत्रातून करण्यात आली ाहे.
मार्च 2022 नगरसेवकांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर मुंबई महापालिका आयुक्त या नात्याने इकबाल सिंह चहल हे प्रशासक म्हणून महापालिकेचा कारभार पाहत आहेत. मात्र या कारभारात पारदर्शकता व उत्तरदायित्वाचा अभाव दिसत असून मनमानी पद्धतीने बीएमसी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जात आहेत, असा आरोप पत्रातून करण्यात आला आहे.
गैरव्यवस्थापन व वित्तीय वैशिष्ट्यांमुळे मुंबई महानगराचे नागरी प्रशासन व कारभार कोलमडले असल्याचं या पत्रात नमूद केलं आहे. यामुळे मार्च 2022 पासून अधिकाऱ्यांचे खच्चीकरण होत आहे. याचा परिपाक म्हणून मुंबई महापालिका कारभार कूचकामी ठरून दर्जा खालावत असल्याचं या पत्रात माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहून निदर्शनास आणलं आहे.
मुंबई महापालिकेतील शिवसेना ठाकरे गट काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी या पत्रावर सह्या करून हे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलं आहे.