Maharashtra rain : कोकणासह पुणे, कोल्हापूर अन् सातारा रेड अलर्टवर, मुंबई-ठाण्यात पावसाची काय स्थिती? वाचा…
हवामान विभागाने इशारा दिल्यानुसार अजून मुसळधार पावसाचे दिवस संपलेले नाहीत. पुढचे काही दिवस अजून मुसळधार बरसणार आहे. मात्र आत्ताच जनजीवन विस्कळीत झाले आहे.
पुणे : राज्यात आता चांगल्या पावसाला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी 9 जुलैपर्यंत रेड अलर्ट (Red alert) जारी करण्यात आला आहे. तर पालघर, पुणे, कोल्हापूर आणि सातारा 8 जुलैपर्यंत रेड अलर्टवर आहे. मुंबई आणि ठाणे 10 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्टवर (Orange alert) आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागातर्फे देण्यात आली आहे. हवामान खात्यातर्फे मुंबईत अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबई शहरासह उपनगरांमध्ये आणि नजीकच्या शहरांमध्ये पुढच्या तीन-चार तासांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची (Heavy rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून मुंबईत जोरदार पाऊस सुरू आहे. पाण्याचा निचरा होण्यासाठी महापालिकेतर्फे यंदा व्यवस्था चांगली करण्यात आली आहे. दरम्यान, अजूनही पाऊस सुरू असून पुढील काही तास मुंबईकरांसाठी महत्त्वाचे आहेत.
दोन दिवसांपूर्वीच दिला होता इशारा
पुढील पाच दिवस कोकण आणि 7 आणि 8 जुलै रोजी मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडणार आहे, असा इशारा दोन दिवसांपूर्वीच हवामान विभागाने वर्तवला होता. यानुसार पुण्यासह मध्य महाराष्ट्र आणि मुंबई परिसरातदेखील मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईसह पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. नाशिक, पुणे, कोल्हापूर आणि सातारा या घाट परिसरात 6 जुलै ते 8 जुलै दरम्यान अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. 7 जुलैपासून मुसळधार म्हणजेच 24 तासांच्या कालावधीत 204.5 मिमी इतका किंवा त्याहून अधिक पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.
Maharashtra | Red alert issued for Raigad, Ratnagiri & Sindhudurg till July 9, while Palghar, Pune, Kolhapur & Satara are on red alert till July 8. Mumbai & Thane are on orange alert till July 10: IMD pic.twitter.com/UWMip78mzs
— ANI (@ANI) July 7, 2022
जनजीवन विस्कळीत
हवामान विभागाने इशारा दिल्यानुसार अजून मुसळधार पावसाचे दिवस संपलेले नाहीत. पुढचे काही दिवस अजून मुसळधार बरसणार आहे. मात्र आत्ताच जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईच्या विविध परिसरात गुडघाभर पाण्यातून नागरिकांना वाट काढावी लागत आहे. पुण्याच्या लोणावळ्यात तर गेल्या 24 तासांत 166 मिमी पावसाची नोंद झाली आहे. लोणावळा परिसरात यावर्षी आतापर्यंत 581 मिमी पावसाची नोंद झाली. अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.