लम्पीची धास्ती मुंबई महापालिकेलाही; तबेले आणि गोशाळेची तपासणी करणार
राज्यात लम्पी आजाराचा फैलाव झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. लम्पी आजाराने राज्यातील जनावरे दगावली आहेत. या जनावरांच्या मालकांना एनडीआरएफच्या निकषानुसारच आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

मुंबई: राज्यात लम्पी (lumpy virus) या आजाराचा धोका वाढला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात या आजाराचा प्रादुर्भाव वाढला आहे. या आजारामुळे आतापर्यंत 43 जनावरे दगावली आहेत. त्यामुळे राज्यातील शेतकरी धास्तावले आहेत. मुंबईतही या आजाराचा फैलाव होण्याची भीती वर्तवली जात आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने (bmc) तात्काळ पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई (mumbai) महापालिकेने मुंबईतील सर्व तबेले आणि गोशाळा तपासण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील जनावरांना लम्पीची लागण होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेने हा निर्णय घेतला आहे.
राज्यात लम्पी रोगाचा प्रादूर्भाव वाढल्यानंतर मुंबई महापालिकाही खडबडून जागी झाली आहे. लम्पीच्या धास्तीमुळे महापालिकेने तबेले आणि गोशाळांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी डॉक्टरांची पथके तयार करण्यात येणार आहे. प्रत्येक वॉर्डातील तबेले आणि गोशाळांमध्ये जाऊन जनावरांची तपासणी केली जाणार आहे. तसेच या त्याची माहिती एकत्रित करण्यात येणार असून या तबेले आणि गोशाळांवर वॉच ठेवण्यात येणार आहे.
एनडीआरएफनुसार मदत
दरम्यान, राज्यात लम्पी आजाराचा फैलाव झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. लम्पी आजाराने राज्यातील जनावरे दगावली आहेत. या जनावरांच्या मालकांना एनडीआरएफच्या निकषानुसारच आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. औरंगाबादच्या पैठण येथील सभेतून त्यांनी ही जाहीर घोषणा केली आहे.
आकडेवारी (लागण आणि मृत्यू)
जळगाव – लागण 512, मृत्यू – 17
अहमदनगर – लागण 217, मृत्यू – 14
धुळे – लागण 79, मृत्यू – 1
अकोला – लागण 636, मृत्यू – 1
पुणे – लागण 203, मृत्यू – 3
लातूर – लागण 102
औरंगाबाद – लागण 32
बीड – लागण 23
सातारा – लागण 55
बुलढाणा – लागण 233, मृत्यू – 3
अमरावती – लागण 378 , मृत्यू – 3
उस्मानाबाद – लागण 9
कोल्हापूर – लागण 25
सांगली – 23 , मृत्यू – 0
यवतमाळ – 9, मृत्यू – 0
परभणी – लागण 20
सोलापूर – लागण 10
वाशीम – लागण 20 , मृत्यू – 1
नाशिक – लागण 10
जालना – लागण 7
पालघर – लागण 1