Maharashtra MLC Election : पुन्हा बविआची मनधरणी सुरू, आघाडी आणि भाजप नेत्यांनी घेतली ठाकूरांची भेट; आमदारांना हॉटेलात ठेवणार
Maharashtra MLC Election : विधानपरिषद निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या 3 आमदारांचे मत मिळविण्यासाठी काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विरारला चकरा मारायला सुरुवात केली आहे.
मुंबई: राज्यसभा निवडणुकीत हितेंद्र ठाकूर (hitendra thakur) यांच्या बहुजन विकास आघाडीने मतदानच केलं नाही, असा आरोप करणाऱ्या महाविकास आघाडीने आता विधान परिषद निवडणुकीसाठी (Maharashtra MLC Election) पुन्हा एकदा बविआची मनधरणी सुरू केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बविआचे नेते हितेंद्र ठाकूर यांची काल भेट घेतली. त्यांना आघाडीला मतदान करण्याची विनंती केली. आघाडीपाठोपाठ भाजपच्या (bjp) नेत्यांनीही हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतल्याने ठाकूर कुणाच्या पारड्यात आपले मतं टाकतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विशेष म्हणजे ठाकूर आमचे मित्रं आहेत. त्यामुळे त्यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी आलो होतो, असं तिन्ही पक्षाकडून सांगण्यात आलं. एकीकडे छोट्या पक्षांचं मन वळवण्याचं काम करण्यात येत असतानाच दुसरीकडे कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून पक्षाचे आमदार आणि अपक्ष आमदारांना पुन्हा एकदा हॉटेलात ठेवण्यात येणार आहे.
विधानपरिषद निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या 3 आमदारांचे मत मिळविण्यासाठी काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विरारला चकरा मारायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा विधानपरिषदेचे माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांनी काल विरारमध्ये येऊन हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. काल मंगळवारी काँग्रेस नेते तथा विधानपरिषद उमेदवार भाई जगताप यांनी, तर काल भाजपाच्या आमदार मनीषा चौधरी आणि राष्ट्रवादीचे आमदार दीपक साळुंखे -पाटील यांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेऊन आपणाला मत द्यावे अशी विनती केली आहे.
कॉलेजात बैठक
ठाकूर आणि साळुंखे यांची विवा कॉलेज येथील कार्यालयात बैठक ही झाली. मात्र साळुंखे -पाटील यांनीही इतर नेत्यांप्रमाणेच आपले उत्तर देऊन, माझे ठाकूर परिवाराचे जवळचे संबंध आहेत. आणि मी त्यांना भेटण्यासाठी आलो आहे. असे सांगून विधानपरिषद निवडणुकीबाबत अधिकृत बोलणे टाळले आहे.
आमदारांची हॉटेलवारी
दरम्यान, निवडणुकीत कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून निवडणुकीच्या दोन दिवस आधीपासूनच म्हणजे 18 जून रोजीच भाजप आमदारांना हॉटेलात ठेवणार आहे. ताज हॉटेलातच या आमदारांना ठेवण्यात येणार आहे. या आमदारांची काळजी घेण्याची जबाबदारी आशीष शेलार, गिरीश महाजन आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
काय आहे गणित?
विधान परिषदेच्या प्रत्येक जागेसाठी 27-27 मतांचा कोटा आहे. या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादीच्या दोन, काँग्रेसच्या एका आणि भाजपच्या चार उमेदवारांचा विजय सोपा मानला जात आहे. पहिल्या पसंतीच्या मतदानात एकूण 9 उमेदवार निवडून येऊ शकणार आहेत. परंतु, काँग्रेसचे दुसरे उमेदवार भाई जगताप आणि भाजपचे पाचेव उमेदवार प्रसाद लाड यांच्या काँटे की टक्कर होणार आहे. त्यामुळेच आमदारांना सुरक्षित ठिकाणी ठेवले जात आहे.