अजित पवार यांच्या बंगल्यावर खलबतं, महाविकास आघाडीच्या गोटात हालचालींना वेग, पडद्यामागे नेमकं काय घडतंय?
गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला ऐतिहासिक विजय मिळताना दिसत असताना इकडे महाराष्ट्रातही राजकीय घडामोडींना वेग येऊ लागलाय.
मुंबई : गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला ऐतिहासिक विजय मिळताना दिसत असताना इकडे महाराष्ट्रातही राजकीय घडामोडींना वेग येऊ लागलाय. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे गटाच्या एकत्रित सरकारला घेरण्यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून रणनीती आखली जात आहे. त्यामुळे एकीकडे भाजप सर्वाधिक जागांवर विजय मिळवताना दिसत असलं तरी महाराष्ट्रात भाजपपुढील आव्हानं वाढताना दिसत आहेत.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या ‘देवगिरी’ बंगल्यावर महाविकास आघाडीची बैठक आयोजित करण्यात आलीय. या बैठकीत 17 डिसेंबरच्या महामोर्चाबाबत चर्चा करण्यात येणार आहे. या बैठकीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, काँग्रेस नेते भाई जगताप देवगिरी बंगल्यावर दाखल झाले आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्यासाठी महाविकास आघाडीकडून मुंबईत महामोर्चा काढण्यात येणार आहे. हा महामोर्चा 17 डिसेंबरला निघणार आहे.
हा महामोर्चा जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा काढण्यात येणार आहे. हा महामोर्चा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात निघणार आहे. उद्धव ठाकरे यांनी स्वत: तीन दिवसांपूर्वी याबाबत घोषणा केली होती. त्यानंतर आज पुन्हा महाविकास आघाडीची बैठक आयोजित करण्यात आलीय.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेलं वादग्रस्त विधान आणि सीमावादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मवाळ भूमिका घेतल्याचा आरोप करत महाविकास आघाडी मुंबईत भव्य महामोर्चा काढणार आहे, अशी चर्चा सूत्रांकडून मिळाली आहे.