महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवाराची संपत्ती पाच वर्षांत 500 कोटीवरुन 3300 कोटी, कोण आहे ते उमेदवार?
maharashtra assembly election 2024 richest candidate parag shah: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघात पराग शाह विरोधात महाविकास आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराला निवडणूक रिंगणात उतरवले आहे. पराग शहा विरोधात मविआच्या राखी जाधव उमेदवार आहेत.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी आता दोन दिवस महत्वाचे आहे. ४ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांचे अर्ज माघार घेत येणार आहे. यामुळे विविध राजकीय पक्ष बंडखोरांना शांत करण्याचे प्रयत्न करत आहे. त्यानंतर राज्यातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. विधानसभा उमेदवारीचे निवडणूक अर्ज भरताना उमेदवारांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. त्यात संपत्तीची माहिती दिली आहे. राज्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? याबाबतची माहिती समोर आली आहे. भाजपचे घाटकोपर पूर्वमधून उभे असलेले उमेदवार पराग शहा हे राज्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार असण्याची शक्यता आहे. त्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात ३३८३.०६ कोटी रुपयांची संपत्ती दाखवली आहे. गेल्या पाच वर्षांत त्यांची संपत्ती ५७५ टक्क्यांनी वाढली आहे. २०१९ मधील शपथपत्रात त्यांनी ५००.६२ कोटी असल्याचे जाहीर केले होते.
अशी आहे पराग शहा यांची संपत्ती
पाच वर्षांत शहा यांच्या संपत्तीत चांगलीच वाढ झाली आहे. उमेदवारी अर्ज भरताना निवडणूक आयोगास दिलेल्या शपथपत्रात त्यांनी स्वतःच्या आणि पत्नीच्या नावे ३३८३.०६ कोटी रुपयांची संपत्ती दाखवली आहे. पराग शहा यांच्याकडे २१७८.९८ तर त्यांच्या पत्नी मानसी यांच्याकडे ११३६ कोटींची संपत्ती आहे. त्यांचे बहुतांश उत्पन्न हे शेअर्स आणि इतर गुंतवणुकीच्या रूपात आहे. २०१७ च्या मुंबई महापालिका निवडणुकीत त्यांनी ६९० कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली होती. त्यानंतर २०१९ मध्ये त्यांची संपत्ती कमी झाली.
कोण आहे पराग शहा?
घाटकोपर विधानसभा मतदारसंघातून पराग शाह भाजपच्या तिकिटावर निवडून आले आहे. त्यांचा व्यवसाय रिअल इस्टेट डेव्हलपरचा आहे. त्यांचे गृहनिर्माण प्रकल्प गुजरात आणि चेन्नईमध्ये आहेत. पराग शाह हे मुंबई मनपाचे नगरसेवकसुद्धा होते. मनपा निवडणुकीत ते २०१७ मध्ये प्रभाग क्रमांक १३२ मधून विजयी झाले होते.
अशी होणार लढत
घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघात पराग शाह विरोधात महाविकास आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराला निवडणूक रिंगणात उतरवले आहे. पराग शहा विरोधात मविआच्या राखी जाधव उमेदवार आहेत. राखी जाधव या मुंबई मनपाच्या माजी नगरसेविका आहेत. भाजपमध्ये प्रकाश मेहता या ठिकाणावरुन उमेदवारीसाठी इच्छूक होते. परंतु पराग शाह यांना उमेदवारी मिळाल्यामुळे मेहता गट नाराज झाला असल्याची चर्चा आहे. त्याचा फायदा राखी जावध यांना होणार का? हे २३ नोव्हेंबरलाच स्पष्ट होईल.