विधानसभा अध्यक्षांची तयारी पूर्ण, अपात्रतेप्रकरणी सोमवारपासून सुनावणी?
शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेवरुन, विधानसभेच्या अध्यक्षांच्या हालचाली वाढल्यात. दिल्लीत राहुल नार्वेकरांनी घटनातज्ज्ञांशी चर्चा केली. त्यानंतर आता सुनावणीला प्रत्यक्ष हजर राहण्यासाठी नार्वेकर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंना नोटीस बजावणार असल्याची माहिती समोर आलीय.
मुंबई | 22 सप्टेंबर 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह 16 आमदारांच्या अपात्रतेवरुन, आता विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांचीही तयारी पूर्ण झालीय. दिल्लीत कायदेतज्ज्ञांशी राहुल नार्वेकरांनी चर्चा केली असून, एका आठवड्यात सुनावणी घेणार, असं स्वत: नार्वेकर म्हणालेत. याआधी शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाला विधानसभा अध्यक्षांनी नोटीस पाठवलीय. त्यासंदर्भात 14 सप्टेंबरला पहिली सुनावणीही झाली. आता सुनावणीवेळी प्रत्यक्ष हजर राहण्यासाठी, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंनाही वैयक्तिक नोटीस पाठवली जाणार असल्याची माहिती आहे.
अपात्रतेसंदर्भातला कायदा, अर्थात 10 व्या परिशिष्टानुसार राहुल नार्वेकरांना निकाल द्यावा लागणार आहे. त्याच कायद्यासंदर्भातले बारकावे घटनातज्ज्ञांकडून नार्वेकरांनी समजून घेतलेत. घटनेच्या 10 व्या परिशिष्टात पक्षांतर बंदीच्या नियमानुसार विधानसभेचे अध्यक्ष आमदारांना अपात्र ठरवू शकतात. आमदारांच्या अपात्रतेचा अधिकार विधानसभेच्या अध्यक्षांनाच आहेत, त्यामुळं सुप्रीम कोर्टानं थेट निकाल न देता शिवसेनेचं प्रकरण राहुल नार्वेकरांकडे सोपवलं. मात्र पक्षांतर बंदी हा कायदा आम्हाला लागूच होत नाही. कारण आम्हीच शिवसेना असं शिंदे गटाचं म्हणणंय.
विधानसभा अध्यक्षांना एक आठवड्यात सुनावणी घेण्याचे आदेश
शिंदे गटाच्या आमदारांबद्दल राहुल नार्वेकर काय निकाल देतात हे पाहणं महत्वाचं असेल. मात्र शिंदे गटाचे आमदार अपात्रच होणार, असं आदित्य ठाकरेंचं म्हणणंय. सत्तासंघर्षाची सुनावणी सुप्रीम कोर्टात 9 महिने चालली. त्यानंतर सुप्रीम कोर्टानं निकाल राखून ठेवत 11 मे रोजी फैसला सुनावला. म्हणजेच 11 मे, ते आता 22 सप्टेंबर, 4 महिने झालेत.
सुप्रीम कोर्टानं राहुल नार्वेकरांकडे प्रकरण सोपवताना रिझनेबल टाईम असा उल्लेख केला होता. मात्र अद्याप निकाल न आल्यानं, ठाकरे गटानं पुन्हा सुप्रीम कोर्टाचं दार ठोठावलं. आणि सुप्रीम कोर्टानं तीव्र नाराजी व्यक्त करताना विधानसभेच्या अध्यक्षांना एका आठवड्यात सुनावणीचे आदेश दिले.
राहुल नार्वेकरांचा निकाल, सध्याच्या शिंदे भाजप आणि अजित पवारांच्या महायुती सरकारवर परिणाम करणारा असेल. आमदार अपात्रच झालेत तर, त्या 16 आमदारांमध्ये एकनाथ शिंदेंही आहेत. त्यामुळे तसं झाल्यास सरकारच कोसळेल. मात्र, निकाल बाजूनं येणार की विरोधात येणार यावरुन तर्क-वितर्क आणि दावे प्रतिदावेच सुरु आहेत. निकाल कधी द्यायचा हे नार्वेकरांनाच ठरवायचं आहे.