MLA Disqualification | आमदार अपात्रतेच्या प्रकरणात मोठी अपडेट, महत्त्वाच्या घडामोडी घडण्याचे संकेत
आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सुप्रीम कोर्टात आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर 30 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. त्याआधी मुंबईत आज अतिशय महत्त्वाच्या घडामोडी घडणार असल्याचे संकेत सूत्रांकडून मिळत आहेत.
विनायक डावरुंग, Tv9 मराठी, मुंबई | 25 ऑक्टोबर 2023 : महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडण्याची शक्यता आहे. देशात आगामी काळात लोकसभेची निवडणूक होणार आहे. त्यानंतर लगेच काही महिन्यांनी विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. त्याआधी महाराष्ट्राच्या राजकारणातील घडामोडींकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. कारण महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दीड वर्षांपासून सुरु असलेल्या घडामोडींमुळे राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झालेली आहे. राज्यात स्थिर सरकार असलं तरी आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर अंतिम निर्णय येणं अद्याप बाकी आहे. आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आणि सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडत आहे. याच प्रकरणी आता महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर आता चांगलेच सक्रीय झाले आहेत. त्यामागील कारणही अगदी तसंच आहे. सु्प्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांच्या कामाकाजांवर नाराजी व्यक्त करत ताशेरे ओढले आहेत. तसेच आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांवरील सुनावणीचं वेळापत्रक सादर करण्याबाबत सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना शेवटची संधी दिली आहे. विधानसभा अध्यक्षांनी 30 ऑक्टोबरपर्यंत वेळापत्रक जाहीर केलं नाही तर थेट सुप्रीम कोर्टच वेळापत्रक ठरवणार आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष जोरदार कामाला लागले आहेत.
विधानसभा अध्यक्ष आज सुनावणी घेणार
आमदार अपात्रतेबाबत आज सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर आज पुन्हा सुनावणी घेणार आहेत. विधानसभा अध्यक्षांनी गेल्या आठवड्यातील सुनावणीवेळी महत्त्वाचा निर्णय घेतला होता. 36 याचिकांना 6 गटात एकत्र करुन सुनावणी घेण्याबाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घेतला होता. दोन्ही गटांना कागदपत्रे सादर करण्यासाठी 25 ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर आज संध्याकाळी चार वाजता या प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष प्रत्यक्ष सुनावणी घेणार आहेत.
दरम्यान, सुप्रीम कोर्टातील 30 ऑक्टोबरच्या सुनावणीआधी आमदार अपात्रता प्रकरणात महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. विधानसभा अध्यक्ष सुनावणींचे वेळापत्रक ठरवणार आहेत. त्यासाठी ते महाराष्ट्राचे महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ यांच्यासोबत चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्ष याच आठवड्यात दिल्लीला देखील जाणार आहेत. विधानसभा अध्यक्ष दिल्लीला जावून देशाचे महान्यायअभिकर्ता तुषार मेहता यांची भेट घेणार आहेत. आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर आणि याचिकांचं वेळापत्रक ठरवणार ते त्यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.