‘म्युकरमायकोसिस’च्या रुग्णांना मोठा दिलासा, उपचाराचा सर्व खर्च म. फुले जनआरोग्य योजनेतून होणार, आरोग्यमंत्र्यांची घोषणा
म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर केल्या जाणाऱ्या उपचाराचा सर्व खर्च महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून करण्यात येणार आहे.
मुंबई : राज्यात कोरोनासह म्युकरमायकोसिसचं नवं संकट निर्माण झालं आहे. राज्यात सध्या म्युकरमायकोसिसचे दीड हजार रुग्ण आढळून आले आहेत. 500 जण या आजारातून पूर्णपणे बरे होऊन घरी परतल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. तर 90 जणांचा म्युकरमायकोसिसमुळे मृत्यू झाल्याची माहिती टोपे यांनी दिलीय. त्याचवेळी टोपे यांनी एक अत्यंत महत्वाची घोषणा केलीय. म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर केल्या जाणाऱ्या उपचाराचा सर्व खर्च महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून करण्यात येणार आहे. इतकंच नाही तर या आजारात लागणाऱ्या सर्व औषधांचा खर्चही या योजनेतून दिला जाणार असल्याचंही टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. (health minister rajesh tope’s big announcement about Mucormycosis)
महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत दीड लाख रुपयांपर्यंतची वैद्यकीय मदत केली जात होती. मात्र, म्युकरमायकोसिसमध्ये रुग्णांच्या उपचारासाठी मोठ्या प्रमाणात खर्च लागत आहे. त्यामुळे या योजनेत काहीसा बदल करुन म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवरील उपचारासाठी लागणारा सर्व खर्च या योजनेतून केला जाणार असल्याचं टोपे यांनी जाहीर केलंय. त्यामुळे म्युकरमायकोसिसच्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यात सध्या असलेल्या म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या पाहता 2 लाख एम्फोटेरेसीन बी इंजेक्शन्सची गरज असल्याचं टोपे यांनी सांगितलं.
‘सर्व रेशनकार्ड धारकांना लाभ मिळेल’
म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवरील उपचारासाठी लागणाऱ्या खर्चाबाबत घोषणा करतानाच टोपे यांनी अजून एक महत्वाची माहिती दिली आहे. म्युकरमायकोसिस झालेल्या रुग्णाच्या कुटुंबाकडे कुठल्याही रंगाचे अर्थात पिवळे, केशरी किंवा पांढरे रेशन कार्ड असेल त्या सर्वांना महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून मदत दिली जाईल, असंही टोपे यांनी स्पष्ट केलंय.
राज्यात म्युकरमायकोसीस या आजाराची तीव्रता वाढत असून त्यासाठी बहुआयामी विशेषज्ञ सेवांची गरज भासत आहे. त्यासाठी लागणार खर्च जास्त असून सामान्य रुग्णांवर त्याचा भार पडून नये यासाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत राज्यातील सर्व पात्र नागरिकांवर अंगीकृत रुग्णालयांमध्ये pic.twitter.com/Pz3r3BNZgE
— Rajesh Tope (@rajeshtope11) May 18, 2021
‘एम्फोटेरेसीन बी इंजेक्शनचा साठा कमी’
म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसाठी लागणाऱ्या एम्फोटेरेसीन बी इंजेक्शनचा साठा सध्या कमी आहे. अशावेळी अंदाजे 1 लाख 90 हजार इंजेक्शनच्या ऑर्डर दिल्याची माहिती टोपे यांनी दिलीय. मात्र या कंपन्या डिलिव्हरी करत नाहीत. केंद्र सरकारने कंट्रोल केल्यानं सध्या इंजेक्शनचा सप्लाय होत नाही. हे इंजेक्शन केंद्रानं राज्य सरकारला द्यावे, अशी राज्य सरकारची मागणी असल्याचं टोपे यांनी सांगितलं. तसंच या इंजेक्शनबाबतही आपण ग्लोबल टेंडर काढल्याची माहिती त्यांनी दिलीय. मात्र, त्याचा पुरवठा आपल्याला 31 मे नंतर होणार असल्याचं टोपे यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या :
कोरोनामुक्त मधुमेहींना म्युकोरमायकोसिसचा धोका, लक्षणं कोणती? आजार टाळण्याचे उपाय काय?
Mucormycosis : म्युकरमायकोसिसची भीती वाटतेय? मग ICMR ने सुचवलेल्या ‘या’ गोष्टी कराच…
health minister rajesh tope’s big announcement about Mucormycosis