परदेशातून आलेल्या प्रवाशांची प्राधान्याने चाचणी, 4 नव्या लॅब, नाईलाज झाल्यास कठोर निर्णय घेऊ : टोपे
42 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत, बाकी सर्व निगेटिव्ह (Maharashtra corona update) आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
मुंबई : “महाराष्ट्रात आतापर्यंत 42 कोरोना रुग्ण आहेत. आतापर्यंत 800 टेस्ट झाल्या आहेत, त्यापैकी 42 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत, बाकी सर्व निगेटिव्ह (Maharashtra corona update) आहेत”, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. अद्याप काही रिपोर्ट येणे बाकी आहे, पण जे परदेशवारी करुन आले आहेत, त्यांचीच सध्या चाचणी केली जात आहे, असंही टोपे यांनी सांगितलं. (Maharashtra corona update)
सरकारी कार्यालयातही 50 टक्केपेक्षा कमी कर्माचाऱ्यांनी ऑफिसमध्ये काम करावे याबाबतचा निर्णय लवकर घेणार आहे. त्यामुळे पब्लिक ट्रान्सपोर्ट अर्थात सार्वजनिक वाहतूक कमी होईल. जर नागरिकांनी ऐकले नाही तर पब्लिक ट्रान्सपोर्ट 10 ते 12 दिवस बंद करु, हे मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं आहे. त्यामुळे लोकांच्या हितासाठी असा निर्णय घ्यावा लागू शकतो असा इशारा आरोग्य मंत्र्यांनी दिला.
औरंगाबाद, धुळे, मिरज, सोलापूर या ठिकाणी नव्या लॅब सुरु करण्याला प्राधान्य आहे. तिथे कोरोना चाचणी करण्याची सोय उपलब्ध करु, असं टोपेंनी सांगितलं.
कोरोनाच्या लक्षणे दिसल्यावर किंवा ट्रॅव्हल हिस्ट्रीचा पुरावा असेल तर कोरोनाची चाचणी केली जाते. 2-3 दिवसात हाफकीन आणि जेजेमध्ये टेस्ट सुरु केली जाणार आहे. मी आज पुण्यातील नायडू रुग्णालयाला भेट देणार आहे. चार शहरात लॅब सुरु करण्याला प्राधान्य आहे, असंही राजेश टोपे म्हणाले.
ज्यांना लक्षणे आहेत आणि जे बाहेरुन प्रवास करुन आले आहेत, अशा प्रवाशांचीच तपासणी केली पाहिजे. टेस्ट किट कमी पडत आहेत, त्या कमी पडू नये म्हणून भारत सरकारला विनंती करणार आहोत. जर अपेक्षित पुरवठा भारत सरकारकडून होत नसेल तर महाराष्ट्र सरकारला सांगितल्यास आम्ही आमच्या वतीने किट्स उपलब्ध करून देण्याचे व्यवस्था करु, असं राजेश टोपे यांनी नमूद केलं.
राज्य सरकारी कर्मचारी संख्याही 50 टक्क्याने कमी करण्याचा आम्ही निर्णय घेणार आहे. लोकलची गर्दी कमी झाली नाही तर 10 ते 12 दिवसासाठी लोकल बंद करावी लागेल. जे आवश्यक आहे, ते बंद करणार नाही, असं टोपेंनी स्पष्ट केलं.
आयसोलेशनमध्ये राहण्यासाठी परिवार आणि इतर लोकांनी मदत करायला हवी. बरं होण्याचे प्रमाण मोठे आहे. रोगप्रतिकारक शक्ती या विषाणूवर मात करते. विषाणू पसरु नये म्हणून खबरदारी घेण्याची गरज आहे, असं आवाहन त्यांनी केलं.
ज्या आवश्यक सेवा आहे त्या बंद केल्या जाणार नाही. सलूनही बंद करणार नाही, असं राजेश टोपे म्हणाले.
संबंधित बातम्या