कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटबाबत महाराष्ट्रही सतर्क; आफ्रिकन विमानांवर बंदी घाला, राजेश टोपेंचे केंद्राला साकडे
दक्षिण आफ्रिकेत आढळलेला नवा व्हेरिएंट अत्यंत घातक, जीवघेणा आणि वेगाने पसरणारा असल्यामुळे आरोग्य यंत्रणांची चिंता वाढली आहे. देशातील सर्वच राज्यांना विशेष खबरदारी बाळगण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत.
मुंबई : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा महाराष्ट्रानेही मोठा धसका घेतला आहे. दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या नव्या व्हेरिएंटचा अजून तरी भारतात एकही रुग्ण आढळलेला नाही. मात्र अशा प्रकारचा संसर्ग राज्यात घुसता कामा नये, यासाठी महाराष्ट्र सरकारने खबरदारीची पावले उचलली आहेत. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या विमानांवर तातडीने पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी केली आहे. याचवेळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्यांना मुंबईत क्वारंटाईन केले जाईल, असे सांगितले. महापालिकेने आज सायंकाळी 5.30 वाजता अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.
दक्षिण आफ्रिकेतील नवा व्हेरिएंट घातक
दक्षिण आफ्रिकेत आढळलेला नवा व्हेरिएंट अत्यंत घातक, जीवघेणा आणि वेगाने पसरणारा असल्यामुळे आरोग्य यंत्रणांची चिंता वाढली आहे. देशातील सर्वच राज्यांना विशेष खबरदारी बाळगण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रही सतर्क झाला आहे. याबाबत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज जालना येथे पत्रकार परिषद घेऊन नव्या व्हेरिएंटबाबत राज्य सरकारने नेमकी कोणती प्रतिबंधात्मक पावले उचलली आहेत व उचलली जाणार आहेत, याची माहिती दिली.
जागतिक आरोग्य संघटनेला (डब्लूएचओ) 9 नोव्हेंबरला नव्या व्हेरिएंटची माहिती मिळाली. आतापर्यंत कोरोनाचे 7 नवे म्युटेड व्हेरिएंट आले आहेत. लस घेतलेल्या अर्थात लसवंतांनाही नव्या कोरोना विषाणूचा धोका आहे. सर्वप्रथम दक्षिण आफ्रिकेत नव्या व्हेरिएंटचा पहिला रुग्ण आढळला आहे. नवा व्हेरिएंट काळजी करण्यासारखा आहे. या अनुषंगाने केंद्राच्या सूचनेकडे राज्याचे लक्ष लागले आहे, असे टोपे यांनी सांगितले.
राज्य सरकारचे केंद्राला पत्राद्वारे साकडे
राज्य सरकारने विमानसेवेसंदर्भात केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे. ठराविक विमानसेवा बंद करण्याचा अधिकार केंद्राकडे आहे. दक्षिण आफ्रिकेतून येणारी विमानं थांबवायला हवी. परिस्थितीबाबतची माहिती केंद्राला दिली आहे. देशात ह्या प्रकारचा व्हेरिएंट सापडलेला नाही. आफ्रिकेच्या भागातून येणाऱ्यांसाठी 72 तासांची आरटीपीआर टेस्ट अनिवार्य आहे. दक्षिण आफ्रिकेतून येणारी विमानं पूर्णतः बंद करायला पाहिजेत.
आफ्रिकेतून येणाऱ्यांसाठी निगेटिव्ह आरटीपीसीआर बंधनकारक असेल. नमुने तपासण्याचं काम सुरु आहे. आपल्याला सतर्क रहावं लागेल. विमान प्रवास करुन आलेल्यांची कोरोना तपासणी सुरु केली आहे. दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्यांचं स्क्रिनिंग सुरु आहे. ओमिक्रॉन विषाणूचं संसर्ग प्रमाण अधिक असेल तर त्या देशातील विमानं बंद केलेली बरी, अशी भूमिका राजेश टोपे यांनी मांडली.
शाळा सुरु करण्याबाबत उद्याच्या बैठकीत चर्चा
राज्य सरकारने राज्यात सर्वत्र पहिलीपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच नवा व्हेरिएंट आला आहे. या पार्श्वभूमीवर शाळा सुरु करण्याबाबत उद्याच्या बैठकीत चर्चा होईल. केंद्राच्या निर्णयाकडे सूचनेकडे राज्याचे लक्ष लागले आहे. साडेसात कोटी जनतेने लसीचा पहिला डोस घेतला आहे. राज्यात 11 कोटी लसीकरणाचा टप्पा पार झाला आहे, असेही टोपे यांनी स्पष्ट केले.
आफ्रिकेतून येणाऱ्यांचे मुंबईत क्वारंटाईन
दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्यांना मुंबईत क्वारंटाईन केले जाईल, असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. ख्रिसमस येत असून जगभरातून लोक आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी मुंबईत येतात. या अनुषंगाने मुंबई महापालिका पूर्ण खबरदारी घेत आहे. कोरोनाचा नवीन व्हेरिएन्ट अनेक देशांमध्ये चिंतेचे कारण बनला आहे. त्याचा मुकाबला करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. परंतु, लोकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे आणि फेस मास्क वापरावे, असे आवाहन महापौर पेडणेकर यांनी केले. (Maharashtra is also alert about the new variant of Corona, Rajesh Tope demands ban on African planes)
इतर बातम्या