Chaityabhoomi | दर्शन रांगेवरुन चैत्यभूमीवर गोंधळ, दोन गटात वाद, काही मिनिटातच परिस्थिती नियंत्रणात
पोलिसांना सहकार्य करण्याची सर्वांची तयारी होती. मात्र बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी सर्वांना आत सोडण्यावरुन वाद निर्माण झाला. यावेळी दोन गट पडले.
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (6th December Mahaparinirvan Din) महामानवाला अभिवादन करण्यासाठी मुंबईतील दादर भागात असलेल्या चैत्यभूमीवर (Dadar Chaityabhoomi) भीमसागर उसळला आहे. सकाळपासून रांगेत दर्शन झालं, मात्र दुपारच्या वेळेस दर्शनाला सोडण्यावरुन वाद उफाळल्यामुळे दोन गटात गोंधळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं.
नेमकं काय घडलं?
नेते आनंदराज आंबेडकर यांचे कार्यकर्ते दुपारच्या सुमारास चैत्यभूमीवर एकवटले होते. पोलिसांना सहकार्य करण्याची सर्वांची तयारी होती. मात्र बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी सर्वांना आत सोडण्यावरुन वाद निर्माण झाला. यावेळी दोन गट पडले.
दर्शनाला आत जाताना काही जणांना अडवल्याने गोंधळ निर्माण झाला. फक्त आमच्याच वेळी गाईडलाईन्स का दिल्या जातात, काही जणांनाच प्रवेश का दिला जातो, असा प्रश्न काही कार्यकर्त्यांनी विचारला. काही जणांनी शांततेत दर्शन घेऊ देण्याची मागणी करत जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचा आरोप केला.
परिस्थिती नियंत्रणात
त्यानंतर पोलिसांकडून गेट बंद करत अनुयायांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. तेव्हा पोलीस आणि एका गटात काहीशी झटापट झाली. मात्र काही मिनिटातच तणाव निवळला आणि परिस्थिती पूर्वपदावर आल्याचं चित्र पाहायला मिळालं.
वानखेडेंविरोधात घोषणाबाजी
एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी सकाळी चैत्यभूमीवर हजेरी लावली असता, त्यांच्या विरोधात चैत्यभूमीवर घोषणाबाजी करण्यात आली होती. त्यामुळे समीर वानखेडे यांचे समर्थक आणि विरोधक यांच्यात हमरीतुमरी झाली. वानखेडेंच्या मुद्द्यावरुन समर्थक आणि विरोधक एकमेकांना भिडल्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. समीर वानखेडे यांना चैत्यभूमीवर येण्याचा नैतिक अधिकार नाही. असं म्हणत भीमशक्ती रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष अनिल दगडू कांबळे यांनी विरोध केला होता.
संबंधित बातम्या :
Sameer Wankhede | चैत्यभूमीवर अभिवादन, वानखेडेंच्या विरोधात घोषणाबाजी; तर प्रकाश आंबेडकरांशीही चर्चा