Ajit Pawar : शिंदे गटाला ज्याची भीती तेच झालं, राज्याच्या तिजोरीच्या चाव्या पुन्हा अजित पवार यांच्या हाती, पाहा कोणाकडे कोणतं खातं?
शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं समजत आहे. अशातच राष्ट्रवादीला देण्यात आलेल्या खात्यांची संभाव्य यादी टीव्ही9 मराठीच्या सूत्रांना मिळाली आहे. यामध्ये शिंदे गटातील आमदारांची मोठी गोची होणार आहे.
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा शपविधी झाल्यावर आता आणखी हालचाली वाढल्या आहेत. शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं समजत आहे. अशातच राष्ट्रवादीला देण्यात आलेल्या खात्यांची संभाव्य यादी टीव्ही9 मराठीच्या सूत्रांना मिळाली आहे. यामध्ये शिंदे गटातील आमदारांची मोठी गोची होणार आहे. कारण संभाव्य यादीनुसार अजित पवार यांच्याकडेच महसूल खातं जाणार असल्याने शिंदे गटातील आमदारांमध्ये नाराजीचा सूर असल्याचं पाहायला मिळत होतं.
कोणाकडे कोणतं खातं?
अजित पवार यांच्याकडे महसूल, दिलीप वळसे-पाटील यांना सांस्कृतिक, धनंजय मुंडे यांना सामाजिक तर छगन भुजबळ यांच्याकडे ओबीसी आणि हसन मुश्रीफ यांना कामगार खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे परत राज्याच्या तिजोरीच्या चाव्या अजित पवारांकडे जात असल्याचं पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी सरकार असताना शिंदे गटातील आमदारांनी ते निधी देत नसल्याची तक्रार केली होती. मात्र आता परत एकदा अर्थाखातं हे अजित दादांकडे जाणार असल्याने शिंदे गटातील आमदारांमध्ये नाराजीचा सूर असल्याच्या चर्चांणाही उधान आलं आहे.
राष्ट्रवादीकडे अर्थ, जलसंपदा आणि बांधकाम ही खाती देऊ नका अशी मागणी शिंदे गटातील आमदारांनी केली आहे. अर्थ खातं त्यांना दिल्यास अजितदादा आमचं करिअर संपवतील असंही शिंदे गटातील आमदारांनी म्हटलं आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. परंतु संभाव्य यादीमध्ये अजित पवार यांना महसूल खातं असण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडे जाणाऱ्या खात्यांची संभाव्य यादी-
अजित पवार- महसूल खातं, दिलीप वळसे -पाटील – सांस्कृतिक व कृषी खातं, धनंजय मुंडे- सामाजिक न्याय खातं, हसन मुश्रीफ- अल्पसंख्यांक आणि कामगार, आदित तटकरे- महिला व बाल कल्याण, धर्मराव आत्राम- आदिवासी विकास खातं, संजय बनसोडे- क्रीडा व युवक कल्याण आणि अनिल पाटील – अन्न व नागरी पुरवठा अशी राष्ट्रवादीली खाती असण्याची संभाव्या यादी समोर आली आहे.