आधी नितेश राणेंचं म्याव, म्याव, मग मलिकांचा कॉकटेल ‘कोंबडा’ आणि आता पुन्हा राणेंकडून ‘डुक्कर’, ट्विट, राजकारणाचा स्तर घसरतोय?

| Updated on: Dec 25, 2021 | 5:33 PM

राज्याचं अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनात राजकारण तापलेलं असतानाच आता राजकारणाचा स्तरही घसरताना दिसतो आहे. एकमेकांना म्याव... म्याव करण्यापासून ते डुक्कर आणि कोंबड्यांचे फोटो ट्विट करून एकमेकांना डिवचण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.

आधी नितेश राणेंचं म्याव, म्याव, मग मलिकांचा कॉकटेल कोंबडा आणि आता पुन्हा राणेंकडून डुक्कर, ट्विट, राजकारणाचा स्तर घसरतोय?
नवाब मलिक, नितेश राणे
Follow us on

मुंबई: राज्याचं अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनात राजकारण तापलेलं असतानाच आता राजकारणाचा स्तरही घसरताना दिसतो आहे. एकमेकांना म्याव… म्याव करण्यापासून ते डुक्कर आणि कोंबड्यांचे फोटो ट्विट करून एकमेकांना डिवचण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्यामुळे राजकारणाचा स्तर घसरतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

नितेश राणेंचं म्याव म्याव

नितेश राणे यांनी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न केला. आदित्य ठाकरे विधानसभेत येत असताना पायरीवर आंदोलन करत असलेल्या नितेश राणे यांनी म्याव म्याव करून डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी एक फोटो ट्वीट केला होता. मलिक यांनी कोंबडीचा फोटो ट्वीट करत नितेश राणेंवर निशाणा साधला. या फोटोकडे निट पाहिलं तर शरीर कोंबडीचं आणि तोंड मांजरीचं असल्याचं पाहायला मिळत आहे. तसंच हा फोटो ट्वीट करताना मलिक यांनी पैहचान कौन? असा खोचक सवालही केला होता. त्याला उत्तर म्हणून नितेश राणेंनीही डुकराचा एक फोटो ट्विट केला होता. “ही प्रजाती फक्त भंगारात आढळते, ओळखा पाहू कोण?”, अशा ओळी नितेश राणे यांनी ट्विट केलेल्या फोटोसोबत लिहिल्या होत्या.

 

वैयक्तिक द्वेष आणि तिरस्काराचं राजकारण वाढलं

राज्यातील राजकारणाचा स्तर घसरत असल्याचं राजकीय विश्लेषकांना वाटत आहे. महाराष्ट्रातील राजकीय परंपरा चांगली आहे. निवडणुकीत दोन्ही पक्ष एकमेकांवर टीका करतात. पण त्यांची वैयक्तिक मैत्री असते. बाळासाहेब ठाकरे हे शरद पवारांना मैद्याचं पोतं म्हणायचे. पण सभा संपल्यावर विरोध मावळायचा. मैत्री कायम राहायची. आता वैयक्तिक द्वेष आणि तिरस्काराचं राजकारण होत आहे. तरुण पिढीला तर बोलण्याचं भान राहिलं नाही, असं राजकीय विश्लेषक आणि ज्येष्ठ राजकीय पत्रकार विवेक भावसार यांनी सांगितलं. नितेश राणे हे शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याला एकेरीच भाषेत बोलतात. ते चुकीचे आहे. कदाचित असं खालच्या दर्जाचे बोललो तर लोकांचं मत आपल्याबद्दल चांगलं होईल असं त्यांना वाटत असावं. पण तसं नाही. मतदार निवडणुकीत जागा दाखवत असतात. भाजपने अशा बेताल नेत्यांना आवरायला हवे. आज ते इतर पक्षांवर बोलत आहेत. उद्या ते त्यांच्याही अंगलट येऊ शकेल, असंही भावसार यांनी सांगितलं.

 

नव्यांना तमीज राहिली नाही

नवीन नवीन राजकारणात आले आहेत. त्यांच्या बापजाद्यांनी जी मेहनत घेतली. तेवढी यांना घ्यावी लागली नाही. त्यांना सर्व आयते मिळाले आहे. त्यामुळे त्यांना लोकभावनेची जाणीवच नाहीये. म्हणूनच त्यांना तमीज नाही. राजकारणात कसे वागायचं याचे संकेत त्यांना कळत नाहीये, असं ज्येष्ठ राजकीय पत्रकार अभिमन्यू शितोळे यांनी सांगितलं.

खालपासून वरपर्यंत हाच प्रॉब्लेम

आम्ही जे करतोय त्याचं फार कौतुक होतंय, प्रसारमाध्यम त्याला उचलून धरतंय यातच राजकारणाचं मर्म आहे असं त्यांना वाटतं. ही थिल्लर पब्लिसिटी आहे. तुम्ही काय बोलता यावर तुमचं व्यक्तिमत्त्व ठरत असतं. हा फक्त नव्या व्यक्तिचा प्रॉब्लेम नाही. तर खालपासून वरपर्यंतच्या लोकांचा हा प्रॉब्लेम आहे. वरिष्ठही तसेच वागत असल्याने खालचे नेतेही तसेच बोलत असतात. त्यामुळे त्यांच्याकडूनही काही वेगळी अपेक्षा करता येत नाही, असंही शितोळे यांनी सांगितलं.

जनतेचा कौल काय?

दरम्यान, राज्याच्या राजकारणाच्या घसरत्या स्तरावर आम्ही आज सकाळी जनतेचा पोल घेतला होता. आधी नितेश राणेंचं म्याव, म्याव, मग मलिकांचा कॉकटेल ‘कोंबडा’ आणि आता पुन्हा राणेंकडून ‘डुक्कर’, ट्विट, राजकारणाचा स्तर घसरतोय?, असा थेट प्रश्न आम्ही जनतेला विचारला होता. त्यावर आज संध्याकाळी 5.15 वाजेपर्यंत 81 टक्के लोकांनी राजकारणाचा स्तर घसरत असल्याचं सांगितलं. तर 19 टक्के लोकांनी राजकारणाचा स्तर घसरत नसल्याचं सांगितलं.

poll

संबंधित बातम्या:

अनिल परब यांना सीबीआयचं समन्स?, परब म्हणतात…

नाशिकमध्ये परवानगीविनाच भिर्रर्र…आयोजक सत्ताधारी शिवसेनेचे माजी आमदार, कोरोनाचे नियम पायदळी

Omicron cases: महाराष्ट्रासह देशात लॉकडाऊन परततोय, कोणत्या राज्यात कोणते निर्बंध?; नव्या वर्षात बाहेर जाण्याचा विचार करताय तर हे नियम वाचा