आमदारांचे पुन्हा काय झाडी, काय डोंगर…सत्तेच्या दाव्यापूर्वीच महाविकास आघाडीने अगोदरच टाकला डाव, मग अपक्षांचे काय?
Maharashatra Vidhansabha Election 2024 Hotel Politics : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची निकालाची घंटा वाजण्यापूर्वी घडामोडींना वेग आला आहे. बहुमत न मिळाल्यास ऐनवेळी हताशी असावेत म्हणून अपक्ष, बंडखोरांना चुचकारण्यात येत आहे. सत्तेच्या दाव्यापूर्वी फाटाफूट टाळण्यासाठी अजून एक डाव टाकण्यात आला आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर म्हणजे उद्या लागेल. एक्झिट पोलवर कुणाचा भरवसा नसल्याचे एकंदरीत राजकीय गोळाबेरजेवरून लक्षात येत आहे. महाविकास आघाडी, महायुतीपेक्षा अधिक सतर्क असल्याचे दिसले. दोन्ही गट आमदारांची मोट बांधून आहेत. त्यात फाटाफूट होऊ नये यासाठी ते सतर्क झाले आहेत. भाजपाने सर्वच आमदारांना सोबत ठेवण्याची कसरत सुरू केली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने पण सर्व आमदारांना घेऊन राज्य बाहेर जाण्याची योजना आखल्याचे समोर येत आहे.
गुरुवारी संजय राऊत आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांची बैठक झाली. जर महाविकास आघाडी आणि महायुतीत टफ फाईट झाल्यास सत्ता स्थापनेसाठी दोन्ही गट प्रयत्न करणार आहेत. त्यासाठी अपक्ष, बंडखोरांना लोणी लावण्यात येत आहे. त्यांची मोट बांधण्यात येत आहे. तर दुसरीकडे स्वतःचे विजयी आमदार सांभाळण्याचे आव्हान महाविकास आघाडीसमोर आहे
या बैठकीनुसार, या आमदारांना काँग्रेस शासित राज्यांमध्ये पाठवण्यात येणार आहे. एका माहितीनुसार या आमदारांना कर्नाटक वा तेलंगणा येथे नेण्यात येईल. या आमदारांना शनिवारीच इतर राज्यात पाठवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. म्हणजे विजयाचा गुलाल उधळला की हे आमदार इतर राज्यात रवाना होतील. यामध्ये किती अपक्ष आणि बंडखोर असतील हे निकालानंतरच समोर येईल. त्यांची पण बाहेरच्या राज्यात बडदास्त ठेवण्यात येईल हे वेगळं सांगायला नको.
आमदार कधी येणार परत
बहुमताची गोळाबेरीज करताना महायुतीकडे किती आमदार आहेत हे पाहण्यात येईल. त्यांच्याकडे बहुमताचा आकडा नसल्यास महाविकास आघाडी सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. त्यापूर्वी अर्थातच सर्व आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र आणि इतर सोपास्कार करण्यात येईल. त्यानंतर या आमदारांना मुंबईत आणण्यात येणार आहे. यापूर्वी महाविकास आघाडीचे सरकार कोसळले तेव्हा शिवसेनेच्या आमदारांना अगोदर सुरत मग गुवाहाटी आणि गोव्यातून महाराष्ट्रात आणण्यात आले होते. तसाच काहीसा प्रकार आता होणार आहे. एक्झिट पोलवर महाविकास आघाडीला भरवसा नाही. संजय राऊत यांनी सुद्धा महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचा दावा केला आहे.