…तर महाविकास आघाडी सरकारला सळो की पळो करु; प्रविण दरेकरांचा इशारा
भाजपा-शिवसेना युती सरकाच्या काळात 2017 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी झोपडपट्टी पुनर्वसन कायद्यामध्ये सुधारणा केली होती. त्यानंतर 2018 साली यांसदर्भात शासन निर्णय प्रसिध्द करण्यात आला व पात्रतेसंबंधाच्या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करण्याचे निश्चित करण्यात आले होते.
मुंबई : भाजपा-शिवसेना युती सरकाच्या काळात 2017 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी झोपडपट्टी पुनर्वसन कायद्यामध्ये सुधारणा केली होती. त्यानंतर 2018 साली यांसदर्भात शासन निर्णय प्रसिध्द करण्यात आला व पात्रतेसंबंधाच्या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करण्याचे निश्चित करण्यात आले होते. परंतु महाविकास आघाडी सरकारकडून या निर्णयची तातडीने अंमलबजावणी होत नसल्यामुळे एसआरए मध्ये राहणाऱ्या हजारो कुटुंबियांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारने आता या विषयी गांभीर्याने लक्ष घालून निर्णय घेतला नाही तर भाजपाच्या वतीने अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल. हे आंदोलन फक्त उपनगरापुरते मर्यादित न राहता संपूर्ण मुंबईतील झोपडपट्टीवासीय या आंदोलनात उतरतील आणि महाविकास आघाडी सरकारला सळो की पळो करुन सोडतील, असा जोरदार इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज दिला. (Mahavikas aghadi govt will be in trouble in SRA issue : Pravin Darekar)
झोपडवट्टीवासीयांना न्याय देण्यासाठी भाजप उत्तर मुंबईच्यावतीने आज बोरिवली देवीपाडा येथे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर व खासदार गोपाळ शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली भव्य जन आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. योवळी मुंबई उपाध्यक्ष प्रकाश दरेकर, जिल्हा अध्यक्ष गणेश खणकर, बाबा सिंग, दिलीप पंडित, दिलीप उपाध्याय यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, झोपडपट्टीमधील सर्वसामान्य रहिवाश्यांच्या वतीने मी खासदार गोपाळ शेट्टी यांचे आभार व्यक्त करतो. खासदार शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली आज खऱ्या अर्थाने गरिबांचा, स्थानिक राहिवाश्यांचा जिव्हाळ्याचा विषय हाती घेऊन रस्त्यावर आंदोलन करत सरकारकडून न्याय मागण्यासाठी अतिशय मोठं काम ते करीत आहेत. ज्यावेळी आपलं आंदोलन गरिबांसाठी असते व ते प्रामाणिक असतं त्यावेळी ते आंदोलन सर्वसामान्य जनतेचं असतं. याचे प्रत्यंतर आज गोपाळ शेट्टी यांच्या जन आंदोलनातून दिसून येत असल्याचे दरेकर यांनी सांगितले.
“सर्वसामान्य रहिवाशाला सुद्धा घर मिळालं पाहिजे”
दरेकर आपल्या भाषणात म्हणाले की, उंच उंच टॉवर मध्ये नागरिक राहतात, पण त्यांना आपली गरज नाही, त्यांना चांगल्या सुविधा मिळतात परंतु देवीपाडा भागातील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या सर्वसामान्य रहिवाशाला सुद्धा घर मिळालं पाहिजे हे त्यांचं आयुष्याचं फार मोठं स्वप्न असतं. परंतु सरकारच्या आज अनेक एसआरएच्या स्कीम रखडल्या आहेत. या स्कीम मध्ये असणाऱ्या अनेक नागरिकांना गेल्या अनेक वर्षापासून भाडे मिळत नाही. या स्कीम मध्ये झोपडीमधील पोटमाळ्याचा जागेचा प्रश्न अनुत्तरित असतो. पोटमाळ्याच्या जागे संदर्भात बिल्डरर कोणताही निर्णय घेत नाही. त्यामुळे हे सर्व महत्वाचे विषयांना न्याय देण्यासाठी खासदार गोपाळ शेट्टी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.
…तर महाविकास आघाडी सरकारला सळो की पळो करु : दरेकर
दरेकर म्हणाले, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे आपण येथे आभार व्यक्त करत आहोत कारण, ज्यावेळी हा विषय गोपाळ शेट्टी यांच्या माध्यमातून त्यांच्याकडे गेला, त्यावेळी त्यांनी यासंदर्भात एक निर्णय केला आणि पोटमाळा किंबहुना पहिला माळा याला किती रेट आकारण्यात येईल आणि लोकांना घर देता येईल यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. आठ लाख पासष्ट हजार रुपयांपर्यंत पंतप्रधान आवास योजनेतलं अनुदान वजा करून त्या रहिवाश्यांना दिलासा देण्याचा निर्णय फडणवीस यांनी घेतला. कोर्टाच्या आदेशानुसार, विधी व न्याय विभागाने सुद्धा सकारात्मक भूमिका घेतली. आता केवळ अंमलबाजावणीची गरज आहे. जर येत्या काही दिवसात याची अंमलबजावणी झाली नाही तर एसआरए आणि सरकारला मुंबईतला झोपडपट्टीमधील सर्वसामान्य माणूस सळो की पळो केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा दरेकर यांनी दिला.
“एसआरए आमच्यासाठी प्राधान्यक्रम”
राज्य सरकराने फडणवीस यांनी घेतलेला निर्णय अंमलात आणला नाही तर हा निर्णय अंमलात आणण्याच्या दृष्टीने , मुंबई स्तरावर यासंदर्भात भूमिका ठरविण्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, खासदार गोपाळ शेट्टी, मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा, आदी मान्यवर तसेच या विषयातील तज्ञ लोक एकत्रित येऊन आम्ही आमच्या आंदोलनाची दिशा ठरवू, असे स्पष्ट करतानाच दरेकर म्हणाले की, मुंबईकर विशेषत: उपनगरवासीयांसाठी एसआरए हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. म्हणून आमच्यासाठी त्यांचे प्रश्न प्राधान्यक्रम आहेत. एसआरए मधील रहिवाशांना त्यांचे हक्काचे घर मिळवून देण्यासाठी भाजप त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. त्यादृष्टीने येथील रहिवाशांना कर्ज देण्याची सेवा उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक सुद्धा अत्यल्प व्याज दरात तात्काळ लोकांना कर्ज उपलब्ध करून देईल असा विश्वास दरेकर यांनी यावेळी व्यक्त केला.
इतर बातम्या
Aurangabad Top 5: औरंगाबादकरांसाठी आजच्या महत्त्वाच्या पाच बातम्या, जाणून घ्या मोजक्या शब्दात
सुप्रिया सुळेंचा दरेकरांच्या विधानावर बोलण्यास नकार, म्हणाल्या; माझ्यावर यशवंतराव चव्हाणांचे संस्कार
(Mahavikas aghadi govt will be in trouble in SRA issue : Pravin Darekar)