“ठाकरेंनी अडीच वर्षे नेभळट सरकार चालवलं” भाजप नेत्यांनी मविआचा सगळा कारभारच मांडला
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सीमावादावर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय समित्यांशी, मंत्रिमंडळाशी भेटीगाठी आणि चर्चा केली जात आहे.
मुंबईः राज्यात गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल आणि भाजपच्या नेत्यांकडून वारंवार छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत. त्यामुळे महापुरुषांचा अवमान, सीमाभागातील गावांना महाराष्ट्रातून फोडण्याचा कट, महाराष्ट्रातून उद्योगांची पळवापळवी, वाढती महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांना आधार देण्यात आलेलं अपयश, याच्या निषेधार्थ महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र अभिमानींचा 17 डिसेंबर रोजी मुंबईत भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सांगितले आहे.
त्याबद्दल भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी बोलताना सांगितले की, ज्या महाविकास आघाडीच्या सरकारने गेल्या अडीच वर्षात जनतेची, शेतकऱ्यांची कामं केली नाहीत.
त्या नेभळट ठाकरे सरकारने शिंदे-भाजप सरकारवर टीका करू नये असा टोलाही प्रवीण दरेकर यांनी लगावला. महाविकास आघाडीचे सरकार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली चाललेले सरकार हे नेभळट सरकार होते.
त्यामुळे त्यांनी आता चालणाऱ्या आणि लोकांची कामं करणाऱ्या शिंदे-फडणवस सरकारवर टीका करण्याचे काम चालू केले आहे.
त्यासाठी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आडून राजकारण चालू करण्याचं काम हे विरोधक करत असल्याचा ठपकाही त्यांनी त्यांच्यावर ठेवला आहे.
यावेळी त्यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करण्याचा प्रयत्न भाजपकडून कधीही केला जाणार नाही.
छत्रपतींचा आदर काल, आज आणि उद्याही आदर राखला जाईलच त्याबद्दल दुमत नाही मात्र ठाकरे गटाकडून छत्रपतींचे नाव पुढं करून त्यांच्यावर राजकारण करण्याचा प्रयत्न चालू असल्याचेही त्यांनी सांगितले.
सीमावादावर बोलताना आमदार प्रवीण दरेकर यांनी सांगितले की, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सीमावादावर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय समित्यांशी, मंत्रिमंडळाशी भेटीगाठी आणि चर्चा केली जात आहे.
सीमावादाचा प्रश्न राज्याचे मुख्यमंत्री गुवाहाटीला जाऊन सोडवणार का असा टोला लगावल्यानंतर प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरच पलटवार करत म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी टीका, टिप्पणी आणि टोमणे न मारता जरा याकडे स्पष्टपणे पाहावे.
कारण सध्याचं राज्यातील दोन्ही नेतृत्व ही सामंजस्य असून त्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून काम करणं चालूच असल्याचं त्यांनी सांगितले.