मनसेच्या ‘मसल मॅन’चा सर्व पदांचा तडकाफडकी राजीनामा, मनसेला मोठा धक्का?; कारण काय?
मनीष धुरी यांनी राज ठाकरे यांना पत्र लिहून सर्व पदांचा राजीनामा देत असल्याचं म्हटलं आहे. पक्षाने दाखवलेल्या विश्वासाबद्दलही त्यांनी राज ठाकरे यांचे आभार मानले आहेत. वैयक्तिक कारणामुळे सर्व पदांचे राजीनामे देत असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
मुंबई : ऐन मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेला एक मोठा धक्का बसला आहे. मनसेच्या मसल मॅनने पक्षातील सर्व पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. मनसेचे मसल मॅन मनीष धुरी यांनी आपल्या सर्व पदांचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत असल्याचं धुरी यांनी म्हटलं आहे. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर धुरी यांनी मोठा निर्णय घेतल्याने मनसेला या निर्णयाचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे धुरी यांनी कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नसल्याचं म्हटलं आहे.
मसल मॅन म्हणून परिचित असलेले मनीष धुरी यांनी आज सर्व पदांचा तडकाफडकी राजीनामा दिला. मनीष धुरी मनसेचे अंधेरी विभाग अध्यक्ष आहेत. धुरी हे राज ठाकरेंचे भारतीय विद्यार्थी सेनेपासूनचे कट्टर समर्थक आहेत. मनसेच्या अनेक आंदोलनात मनीष धुरी यांचा आक्रमक सहभाग असायचा. त्यांनी राज ठाकरे यांना पत्र पाठवून सर्वच पदांचा राजीनामा देत असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे मनसेत खळबळ उडाली आहे. तसेच धुरी यांच्या जागी अंधेरी विभाग अध्यक्षपदाची धुरा कुणाकडे जाणार? अशी चर्चा रंगली आहे.
अंतर्गत गटबाजीमुळे राजीनामा?
मनीष धुरी यांनी राज ठाकरे यांना पत्र लिहून सर्व पदांचा राजीनामा देत असल्याचं म्हटलं आहे. पक्षाने दाखवलेल्या विश्वासाबद्दलही त्यांनी राज ठाकरे यांचे आभार मानले आहेत. वैयक्तिक कारणामुळे सर्व पदांचे राजीनामे देत असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. तसेच पक्षात यापुढे राज ठाकरे समर्थक म्हणून काम करणार आहे. अन्य राजकीय पक्षात जाणार नसल्याचा शब्दही त्यांनी पत्रातून राज ठाकरे यांना दिला आहे. पश्चिम उपनगरातील पक्षांतर्गत गटबाजीमुळेच धुरी यांनी राजीनामा दिल्याची कुजबुज आहे.
महापालिका निवडणुकीपूर्वी मोठा धक्का?
मुंबई महापालिकेच्या निवडणुका कधीही होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी बांधणी सुरू केली आहे. मनसेनेही मुंबईतील संघटना बांधणीवर प्रचंड भर दिला आहे. असं असताना धुरी यांनी राजीनामा दिल्याने मनसेला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सर्वात जास्त फूट ठाकरे गटात
दरम्यान, मुंबईत सर्वाधिक फूट ठाकरे गटात पडली आहे. आमदार आणि खासदारांनी सोडचिठ्ठी दिल्यानंतर ठाकरे गटाचे जवळपास पाच नगरसेवक शिंदे गटात गेले आहेत. तर शिंदे गटात प्रवेश करण्याचा ओघ अधिक वाढला आहे. त्यामुळे शिंदे यांच्या शिवसेनेचं मुंबईत पारडं जड होताना दिसत आहे.