मराठी मुलीला घर नाकारणाऱ्या सचिवावर मोठी कारवाई, ‘त्या’ मुलीची पहिली प्रतिक्रिया; शर्मिला ठाकरे यांची भेट
तृप्ती देवरुखकर यांच्या तक्रारीवरून मुलुंड पश्चिम पोलीस ठाण्यात जागा नाकारणाऱ्या पितापुत्रांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता. या दोघांना अटक केल्यानंतर त्यांना जामीनही मंजूर झाल आहे. प्रविण ठक्कर आणि निलेश ठक्कर असं या पितापुत्रांचं नाव आहे.

निवृत्ती बाबर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 29 सप्टेंबर 2023 : व्यवसायासाठी भाड्याने जागा मागणाऱ्या महिलेला जागा नाकारण्यात आली. ती केवळ मराठी असल्याच्या कारणावरून तिला जागा नाकारण्यात आली. त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. एका महिलेला केवळ ती मराठी असल्या कारणाने घर नाकारण्यात आल्याच्या प्रकरणाने राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. मनसेने या प्रकरणाची दखल घेऊन सोसायटीच्या सचिवाला चांगलाच दम भरला. त्यामुळे या सचिवाने माफी मागितली आहे. तर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी असले प्रकार पुन्हा खपवून घेणार नसल्याचं म्हटलं आहे.
तृप्ती देवरुखकर यांना जागा नाकारणाऱ्या प्रवीण ठक्कर यांच्यावर सोसायटीने मोठी कारवाई केली आहे. प्रवीण ठक्कर यांची सोसायटीच्या सचिव पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. तसेच या आधीच ठक्कर पितापुत्रांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनसे सैनिक सर्वात आधी आले
दरम्यान, तृप्ती देवरुखकर यांनी आज शिवतीर्थावर जाऊन शर्मिला ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मनसेने दिलेल्या साथीबाबत त्यांचे आभार मानले. मनसे सैनिक सर्वात आधी आमच्या मदतीला धावून आलेहोते. त्यानंतर सर्व राजकीय पक्ष आले. आम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केल्यानंतर इतर राजकीय पक्षही आले. पण सुरुवातीलाच मनसेचे पदाधिकारी माझ्यासोबत आले आणि मदत केली, असं तृप्ती यांनी मीडियाशी संवाद साधताना सांगितलं.
राज्यात असंच घडतंय
मला जागा नाकारण्यात आल्याचा प्रकार उघडकीस झाला आहे. केवळ मराठी असल्याने जागा नाकारण्यात आली आहे. हा प्रकार उघड झाल्यानंतर आता लोक त्यांचे अनुभव सांगत आहेत. हा काही आजच प्रकार घडलेला नाही. मुंबईसह महाराष्ट्रात हे असच घडत आहे. लोकांनी त्यावर आता बोललं पाहिजे, असं तृप्ती म्हणाल्या.
सचिव सोडून कुणालाच अडचण नव्हती
मला जागा द्यायला त्या इमारतीतील लोक तयार होते. ज्यांची जागा बघितली तेही जागा द्यायला तयार होते. हा सर्व प्रकार सचिवाने केला. मी याबाबत जागा मालकाला फोन करून सांगितलं. तेव्हा तिला राग आला. ती म्हणाली, मराठी लोकांना घर द्यायचं नाही असा काही नियम नाही. असा नियम कुणी कुणाला लागू करू शकत नाही. आम्ही सोसायटीच्या मिटिंगमध्ये बोलतो. विशेष म्हणजे जागा मालक स्वत: गुजराती आहेत. त्या इमारतीतील लोकांनाही आमची काही अडचण नव्हती, असं त्यांनी सांगितलं.