MHADA : मुंबईत घ्या हक्काचं घर! दिवाळीत 4 हजार घरांची सोडत, मुंबईत घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण
MHADA : दिवाळीमध्ये मुंबईमध्ये सुमारे 4 हजार घरांची सोडत काढण्याचा निर्णय म्हाडा प्राधिकरणाने घेतला आहे. या निर्णयामुळे अनेकांचं स्वत:च्या घराचं स्वप्न पूर्ण होणार आहे. लवकरच अधिकृत घोषणेची शक्यता आहे.
मुंबई : आपलं हक्काचं, स्वत:चं घर असावं, असं प्रत्येकाला वाटतं. मुंबईसारख्या मोठ्या शहरात, या मेट्रो सिटीमध्ये नोकरीनिमित्त अनेक लोक येतात. त्यांना आपल्या बजेटमध्ये दर्जेदार घर घेण्यासाठी म्हाडाची (MHADA) योजना आहे. त्याकडे त्यांचं लक्ष असतं. छोटं का होईना पण आपलं हक्काचं घर (House) मुंबईत असावं असं प्रत्येकाला वाटतं. हीच घर घेण्याची प्रतीक्षा आता संपणार आहे. मागील तीन वर्षांपासून म्हाडाच्या (Maharashtra Housing and Area Development Authority) घरांच्या सोडतीची मुंबईकरांची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. दिवाळीमध्ये मुंबईमध्ये सुमारे 4 हजार घरांची सोडत काढण्याचा निर्णय म्हाडा प्राधिकरणाने घेतला आहे. या निर्णयामुळे अनेकांचं स्वत:च्या घराचं स्वप्न पूर्ण होणार आहे. मुंबई मंडळाने सोडतीची तयारी सुरू केली असून लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. तीन वर्षांपासून म्हाडाच्या घरांच्या सोडतीची मुंबईकरांची प्रतीक्षा संपणार आहे. यामुळे आता लवकरच होऊ शकतं तुमच्या हक्काचं घर…
2019नंतर मुंबईत सोडत निघालेली नाही
म्हाडाच्या सोडतीकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागलेले असते. त्यामुळे दिवाळीआधी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल. 2019नंतर मुंबईत सोडत निघालेली नाही. तेव्हापासून मुंबईकर घरांच्या प्रतीक्षेत आहे. मुंबई मंडळाकडे सोडतीसाठी पुरेशी घरे नसल्यानं आणि काम सुरू असलेली घरे सोडतीनंतर वर्षभरात ताबा देता येण्याच्या स्थितीत नसल्यानं सोडत रखडली आहे. यामुळे आताच्या या दिवाळीतील सोडतीच्या बातमीमुळे सोडत मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात आल्यानं घराचं स्वप्न पाहणाऱ्यांना दिलासा मिळाल्यास दिसतंय.
चार हजार घरांसाठी सोडत
म्हाडाच्या मुंबईतील सोडतीला प्रचंड प्रतिसाद मिळतो. कारण, स्वस्त आणि दर्जेदार घरं याठिकाणी मिळतात. मुंबईतील अंदाजे चार हजार घरांसाठी सोडत काढण्याची तयारी सुरू केल्याचं म्हाडाच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं. दिवाळीच्या दीड-दोन महिन्यांआधी जाहिरात प्रसिद्ध करून प्रत्यक्ष सोडत काढण्यात येईल, असंही ते म्हणालेत.
कुठे असणार घरं?
म्हाडाच्या (Maharashtra Housing and Area Development Authority) या सोडतीत पहाडी, गोरेगाव येथील 3 हजार 15 घरांपैकी अल्प आणि अत्यल्प गटातील दोन हजार 683 घरांचा समावेश असण्याची शक्यता आहे. तसेच कोळे-कल्याण, अॅन्टॉप हिल, विक्रोळी आदी ठिकाणच्या घरांचाही समावेश असणार आहे.
निवासी दाखला मिळणं सोपं
म्हाडाला नियोजन प्राधिकरणाचे अधिकार मिळाल्यानं निवासी दाखला मिळणंही आता सोपं झाल्याचं म्हाडाच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं. चालू प्रकल्पातील येत्या सहा महिन्यांत किंवा वर्षभरात बांधकाम पूर्ण होऊन निवासी दाखला मिळू शकेल, असे घरांचाही सोडतीत समावेश असेल.